अंबरनाथ : अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वेमार्गावर रुळांखालील स्लिपर्स बसविण्याचे काम करण्यात येत असताना टीआरटी मशीन घसरल्याने एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला, तर दोघे जण जखमी झाले. हा प्रकार बुधवारी पहाटे ३.३० वाजता घडला. या अपघातामुळे सकाळी ९.४५ वाजेपर्यंत या मार्गावरील रेल्वेसेवा ठप्प होती.
अंबरनाथ आणि बदलापूर या रेल्वेमार्गावरील डाऊन दिशेवरील रेल्वेरुळांची दुरुस्ती करण्यासाठी पहाटे दोन वाजेपासून मेगाब्लॉक घेण्यात आला होता. हे काम करीत असताना रुळाखालील स्लिपर्स बदलण्यासाठी रेल्वेने टीआरटी यंत्र मागविले होते. त्याच्या माध्यमातून स्लिपर्स बदलले जात असताना यंत्र घसरल्याने त्याखाली तीन कामगार चिरडले गेले. त्यातील राजू जगडे (३६) या कामगाराचा जागीच मृत्यू झाला. तर त्याच्या सोबत काम करणारे वासुदेव सिद आणि गणेश सिद हे जखमी झाले. त्यांना रेल्वेच्या कल्याण रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले आहे. या अपघातानंतर सकाळपासून कर्जत दिशेकडील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघातानंतर घसरलेली टीआरटी मशीन हलविण्यात आली. हे काम करण्यासाठी तब्बल सहा तास लागले. सकाळी ९.४५ वाजता रेल्वेसेवा पूर्ववत झाली.