Join us

रेल्वे रुळावर, परंतुु मध्य रेल्वेची रडारड सुरूच

By admin | Updated: June 20, 2015 11:05 IST

शुक्रवारी पावसाच्या तडाख्याने ठप्प पडलेली मध्य रेल्वेची वाहतूक शनिवारी पूर्वपदावर येत असतानाच कसारा येथे मालगाडीचे इंजिन बंद पडल्याने कसा-याच्या दिशेने वाहतूक विस्कळीत झाली आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. २० - शुक्रवारी पावसाच्या तडाख्याने ठप्प पडलेली मध्य रेल्वेची वाहतूक शनिवारी पूर्वपदावर येत असतानाच कसारा येथे मालगाडीचे इंजिन बंद पडल्याने कसा-याच्या दिशेने वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे शनिवारीदेखील प्रवाशांची डोकेदुखी कायम आहे. मध्ये रेल्वेची वाहतूक शनिवारी सकाळी जरी सुरू झाली असली तरी बहुतेक गाड्या २५ ते ३० मिनिटे उशीराने धावत होत्या तर अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे प्रवाशांच्या हालात अतोनात भरच पडलेली आहे.

शुक्रवारी मुंबई व उपनगरात जून महिन्यातील रेकॉर्डब्रेक पाऊस पडल्याने तिन्ही मार्गावरील वाहतूक ठप्प पडली होती. शुक्रवार रात्री पावसाचा जोर ओसरल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला. शनिवारी रेल्वे रुळांवरील पाणी ओसरल्याने मध्य रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर आली. मात्र मध्य रेल्वेवरील वाहतूक सुमारे २० ते २५ मिनीटे सुरु आहे. यात भर म्हणजे कल्याण - कसारा मार्गावर आसनगावजवळ मालगाडीचे इंजिन बंद पडले. यामुळे कसा-याच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती. अथक प्रयत्नानंतर हे इंजिन बाजूला काढण्यात यश आले आहे. पश्चिम रेल्वे, हार्बर व ट्रान्सहार्बर मार्गावरील वाहतूक सुरु झाली आहे. मात्र या मार्गांवरील वाहतूकही विलंबाने सुरु आहे.  शनिवारी मुंबईतील शाळा व महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली असून दुपारी समुद्रात भरती येणार आहे.