मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वेवर सुरक्षेसाठी रेल्वेच्या सुरक्षा दलाला तब्बल ५०० जवानांची कमतरता आहे. सामान्य नागरिकांना लोकल प्रवासाची परवानगी दिल्यानंतर हळूहळू प्रवासी संख्या वाढत आहे. त्यामुळे सुरक्षा दलाला अधिक मनुष्यबळाची गरज भासत आहे; तर या रिक्त जागा लवकरच भरल्या जातील, असे मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त जितेंद्र श्रीवास्तव यांनी सांगितले.
मध्य रेल्वे सुरक्षा दलाच्या मुंबई विभागासाठी २ हजार ४०० सुरक्षा दलाचे जवान मंजूर असून त्यात दोन हजारच कार्यरत आहेत. पश्चिम रेल्वेवर ८५० मंजूर पदांपैकी १०० रिक्त जागा आहेत. मध्य रेल्वे मार्गावर सीएसएमटी ते खोपोली, कसारा, पनवेल, गोरेगाव तसेच नेरळ, बेलापूर ते खारकोपपर्यंत पसरली आहे; तर पश्चिम रेल्वे सेवा चर्चगेट ते डहाणूपर्यंत आहे. रेल्वे हद्दीत घडणारे गुन्हे व त्याचा तपास करून पुढील कार्यवाही करण्याची जबाबदारी लोहमार्ग पोलिसांवर आहे; तर रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेबरोबरच रेल्वेची मालमत्ता, तसेच लोहमार्ग ओलांडणाऱ्या प्रवाशांना रोखणे याशिवाय अन्य कारवाया व गुन्ह्यांविरोधात कारवाई करण्याचे काम रेल्वे सुरक्षा दल करीत असते.
सध्या लोहमार्ग पोलिसांकडे तीन हजार ९८६ मंजूर पदांपैकी प्रत्यक्षात तीन हजार २१८ लोहमार्ग पोलीस कर्मचारी कर्तव्यावर हजर असतात. त्यात १५७ अधिकारी आणि तीन हजार ६१ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या मनुष्यबळातच सध्या काम करावे लागत आहे. त्यांना होमगार्डची मदत मिळत होती. परंतु शासनाकडून मानधन थकल्याने होमगार्डकडून होणारी मदत बंद झाली आहे. जवळपास दोन हजार होमगार्ड आणि महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या (एमएसएफ) काही जवानांचीही लोहमार्ग पोलिसांना गरज आहे, असे असतानाच ‘आरपीएफ’लाही मनुष्यबळाची कमतरता भासत आहे.