Join us

रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले

By admin | Updated: September 20, 2015 23:42 IST

प्रवासी नाराज : एकेरी मार्गावरून कसरत

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सव काळात जादा रेल्वेगाड्या सुरू करण्यात आल्याने या गाड्यांना एकेरी मार्ग मोकळा करून देताना रेल्वेचीही कसरत होत आहे. मुंबईतून कोकणात आलेले गणेशभक्त परतीच्या मार्गावर आहेत. त्यामुळे रविवारीही मार्गावरील रेल्वे गाड्या तास ते दोन तास उशिराने धावत होत्या. एस. टी. बसपेक्षा आता रत्नागिरीकर कोकण रेल्वे प्रवासावरच अधिक विसंबून असल्याचेही स्पष्ट होत आहे. कोकण रेल्वे मार्गावर गेल्या ८ सप्टेंबरपासून गणेशोत्सवासाठी जादा गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. या एकेरी मार्गावरून दिवसाला किमान ५० ते ५५ रेल्वेगाड्या नेहमीच धावत असतात. त्यात आता जादा गाड्यांची भर पडली आहे. मात्र, कोकण रेल्वेने यावेळी गणेशोत्सवात भक्तांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी जास्तीतजास्त प्रयत्न केले असून, जादा गाड्यांचे नियोजन केल्याप्रमाणे या गाड्या सुरू आहेत. लोकमान्य टिळक टर्मिनस कुर्ला ते मडगाव व छत्रपती शिवाजी टर्मिनस ते मडगाव, सावंतवाडी, करमाळी या मार्गावर या जादा गाड्या सोडण्यात आल्या आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर गाड्या सुटूनही कोकण रेल्वेत प्रवाशांची गर्दी वाढतच आहे. त्यामुळे रेल्वेने येताना यंदाही प्रवाशांना गर्दीचा त्रास सहन करावा लागला. आता काही दिवसातच मुंबईकरांचा परतीचा प्रवास सुरु होणार आहे.मुंबईकडून येणाऱ्या गाड्यांना आता गर्दी कमी असून, मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांना गर्दी वाढू लागली आहे. ज्यांना सुरुवातीच्या दिवसांमध्ये गणेशोत्सवासाठी येता आले नाही, असे मुंबईकर आता उशिराने गणेश उत्सवात सहभागी होण्यासाठी रेल्वेने कोकणात दाखल होत आहेत. (प्रतिनिधी)सुपरफास्टही बनल्या लोकल?-----एकेरी मार्गावरून किती रेल्वे गाड्या चालवायच्या असा प्रश्न निर्माण झाला असला तरी कोकणवासियांना उत्सवाचे सुख देण्यासाठी या जादा गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मार्गावरील लांब पल्ल्याच्या सुपरफास्ट गाड्याही अनेक स्थानकांवर अन्य गाड्यांच्या क्रॉसिंगसाठी थांबवून ठेवणे भाग पडत आहेत. परिणामी सुपरफास्ट गाड्या लोकल बनल्या आहेत. कोकण रेल्वे मार्गावर ८पासून जादा गाड्या.दिवसाला किमान ५० ते ५५ रेल्वेगाड्या.जादा गाड्यांची भर पडल्याने वाहतूक विस्कळीत.वेळापत्रक कोलमडले.