Join us

रेल्वे प्रकल्पांची होणार ‘छाननी’

By admin | Updated: August 7, 2015 01:02 IST

उपनगरीय मार्गावरील रेल्वे प्रकल्प मार्गी लागणार का, प्रवाशांच्या मागणीनुसार कोणते प्रकल्प राबविले पाहिजे, ते योग्य आहेत की नाही याची आता एका

मुंबई : उपनगरीय मार्गावरील रेल्वे प्रकल्प मार्गी लागणार का, प्रवाशांच्या मागणीनुसार कोणते प्रकल्प राबविले पाहिजे, ते योग्य आहेत की नाही याची आता एका समितीकडून छाननी केली जाणार आहे. रेल्वेमंत्र्यांच्या सूचनेनुसार एक ‘छाननी समिती’ (स्क्रीनिंग कमिटी) नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये मध्य आणि पश्चिम रेल्वेसह अन्य प्राधिकरणांचा समावेश केला जाणार आहे. सध्या मुंबईत अनेक रेल्वे प्रकल्पांची कामे सुरू आहेत. तर काही नवीन प्रकल्पांची घोषणाही नुकतीच करण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे सध्या एमआरव्हीसीच्या (मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन) एमयूटीपी-२ अंतर्गत अनेक रेल्वे प्रकल्पांची कामे ही ठरवलेल्या उद्दिष्टानुसार पूर्णदेखील झाली नसून त्यासाठी अनेक वेळा डेडलाइनदेखील देण्यात येत आहे. यामध्ये सीएसटी-कुर्ला पाचवा व सहावा मार्ग, मुंबई सेंट्रल ते बोरीवली सहावा मार्ग, हार्बरचा गोरेगावपर्यंत विस्तार, हार्बरवर बारा डबा लोकल, ठाणे ते दिवा पाचवा-सहावा मार्ग अशा महत्त्वाच्या प्रकल्पांचा समावेश आहे. एकूणच रखडलेले प्रकल्प पाहता भविष्यातील अन्य प्रकल्पांचीही तीच स्थिती उद्भवू नये यासाठी रेल्वेकडून खबरदारी म्हणून छाननी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर एमआरव्हीसीकडूनच काम केले जात असल्याची माहिती व्यवस्थापकीय संचालक प्रभात सहाय यांनी दिली. या समितीत मध्य आणि पश्चिम रेल्वे, एमआरव्हीसी, एमएमआरडीए, सिडको आणि उम्टा (युनिफाइड मुंबई मेट्रोपोलिटन ट्रान्सपोर्ट अ‍ॅथॉरिटी) यांचा समावेश केला जाणार आहे. रेल्वेचे अनेक प्रकल्प राबवताना प्रवाशांचे मत किंवा सूचना या समितीकडून विचारात घेतल्या जातील. तसेच प्रकल्प प्रवाशांसाठी योग्य आहे की नाही, त्यासाठी येणारा खर्च, नवीन प्रकल्प कोणता असावा अशा सर्व सूचना प्रवाशांकडून विचारात घेतल्या जातील आणि त्यावर समितीमध्ये चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे सहाय यांनी सांगितले.