Join us  

खासगीकरणाबद्दल दिलेले रेल्वेमंत्र्यांचे आश्वासन फसवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 2:57 AM

कर्मचारी युनियन। आता रेल्वे रोको करण्याची वेळ आली

मुंबई : दुसऱ्या खासगी ट्रेननंतर एकही खासगी ट्रेन चालविण्यात येणार नाही, असे आश्वासन रेल्वेमंत्र्यांकडून दिले होते. मात्र हे आश्वासन फसवे ठरले आहे. त्यामुळे आता रेल्वे रोको करण्याची वेळ आली आहे, असे मत रेल्वे कर्मचारी युनियनच्या वतीने व्यक्त करण्यात आले.देशातील १०० वेगवेगळ्या मार्गांवर १५० खासगी एक्स्प्रेस चालविण्यात येणार आहेत. इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (आयआरसीटीसी) यांच्या वतीने या खासगी एक्स्प्रेस चालविण्यात येणार आहेत. यापैकी दिल्ली ते लखनऊ, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद यादरम्यान खासगी तेजस एक्स्प्रेस सुरू केली आहे. तर, आता इंदौर ते वाराणसी काशी महाकाल एक्स्प्रेस २१ फेब्रुवारीपासून धावणार आहे. त्यामुळे खासगी एक्स्प्रेस धावणार नाही, असे फसविणारे आश्वासन रेल्वेमंत्र्यांनी का दिले, असा प्रश्न सेंट्रल रेल्वे मजदूर संघाच्या वतीने मांडण्यात आला.

नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत मुंबई ते अहमदाबाद तेजस एक्स्प्रेसनंतर एकही खासगी एक्स्प्रेस धावणार नाही, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र तरीही तिसरी खासगी एक्स्प्रेस धावणार आहे. आता शांत बसता कामा नये, आता रेल्वे रोको करण्याची वेळ आली आहे. रेल्वेचे खासगीकरण होऊ देणार नाही, असे मत सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे सरचिटणीस प्रवीण वाजपेयी यांनी व्यक्त केले.प्रवाशांचा कोणता फायदा होणार?रेल्वे प्रशासन कोणत्या कारणासाठी खासगी एक्स्प्रेस चालविणार आहे. रेल्वेचे स्थानक, रेल्वेचे रूळ, रेल्वेची वीज, रेल्वेचे सिग्नल वापरून खासगी एक्स्प्रेस चालविणार आहे. यात रेल्वे प्रशासनाचा आणि रेल्वे प्रवाशांचा कोणता फायदा होणार आहे. रेल्वे खासगी कंपन्यांना विकून गरीब प्रवाशांचा प्रवास महागात केला जाणार आहे. एक्स्प्रेस खासगी तत्त्वावर चालविण्यात आल्या, तर प्रवाशांचे सर्वाधिक नुकसान होणार आहे. मुंबई विभागात खासगी एक्स्प्रेस धावू देणार नाही, असे मत नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे महामंत्री वेणू नायर यांनी व्यक्त केले. 

टॅग्स :रेल्वे