मुंबई : खून, खुनाचा प्रयत्न, चोऱ्या, छेडछाड, बलात्कार, हाणामारी यासह मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी मुंबईतील उपनगरीय रेल्वेत वाढल्याचे समोर आले आहे. २0१३मध्ये एकूण २ हजार ६७६ गुन्हे झाले होते. २0१४मध्ये तब्बल ३ हजार ११८ गुन्हे झाल्याचे समोर आले आहे. रेल्वे पोलीस (जीआरपी) आयुक्तालयातर्फे सादर करण्यात आलेल्या गुन्हेगारीच्या आकडेवारीत ही माहिती समोर आली आहे. हे गुन्हे कमी करण्याचा प्रयत्न असेल, असा विश्वास रेल्वे पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी या वेळी आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला. रेल्वेतून प्रवास करताना प्रवाशांना मोठ्या प्रमाणात विविध गुन्ह्यांना सामोरे जावे लागते. चेन, घड्याळ, पाकीटमारी, बॅग चोरी यासह खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, हाणामारी अशा विविध गुन्ह्यांमुळे प्रवाशांचा प्रवास कठीण झाला आहे. तरीही रेल्वे पोलिसांकडून गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र त्यात रेल्वे पोलीस अपयशीच ठरत आहेत. रेल्वे पोलिसांनी सादर केलेल्या गुन्हेगारीच्या आकडेवारीत रेल्वेतील गुन्हेगारीत वाढ झाल्याचे दिसते. २0१३मध्ये २ हजार ६७६ विविध गुन्हे झाले होते. यात १ हजार ७२0 गुन्ह्यांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले. मात्र २0१४मध्ये गुन्हेगारीत मोठी वाढ झाली असून, तब्बल ३ हजार ११८ गुन्हे घडल्याचे समोर आले आहे. यापैकी १ हजार ७११ गुन्हे उघड झाल्याचे सांगण्यात आले. २0१३मध्ये ४ खून झाले होते. यातील ३ खुनांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले. मात्र २0१४मध्ये तब्बल १७ खून झाले आणि यातील १३ गुन्ह्यांचा शोध रेल्वे पोलिसांकडून लावण्यात आला. त्याचप्रमाणे २0१४मध्ये पाकीटमारीच्या ७८८, छेडछाडीच्या ५५ तर बलात्काराची एक घटना घडली आहे. (प्रतिनिधी)
रेल्वेतील गुन्हेगारी वाढली
By admin | Updated: January 21, 2015 02:06 IST