Join us

ब्लॉक: मध्य रेल्वे प्रवाशांचा अंत बघत आहे; रेल्वे प्रवासी संघटनांचा संताप

By सचिन लुंगसे | Updated: May 30, 2024 19:16 IST

तीन दिवसांच्या ब्लॉकमध्ये तर ९३० लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

मुंबई : ठाणे आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील फलाटांच्या रुंदीकरण्यासाठी शुक्रवार, शनिवारी आणि रविवारी घेण्यात आलेला ब्लॉक म्हणजे मध्य रेल्वे प्रशासनाने लोकल प्रवाशांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. मुळातच एवढा मोठा ब्लॉक घेताना रेल्वे प्रशासनाने प्रवासी संघटनांसोबत चर्चा करायला हवी, पर्यायी वाहतूक व्यवस्थेला चालना द्यायला हवी. मात्र त्यापैकी काहीच करण्यात आलेले नाही. दिवसाला १० लोकल फेऱ्या रद्द झाल्या तरी प्रवाशांचे हाल होतात. तीन दिवसांच्या ब्लॉकमध्ये तर ९३० लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ३३ लाखांहून अधिक प्रवाशांना याचा मोठा फटका बसणार असल्याच्या प्रतिक्रिया रेल्वे प्रवासी संघटनांनी दिल्या आहेत. अंत बघत आहेतमध्य रेल्वे प्रशासन मुंबईच्या नागरिकांचा अंत बघत आहे. भारताचा आर्थिक कणा असलेल्या मुंबईच्या लोकल या रक्तवाहिन्या आहेत. मुंबईतील अतिशय महत्वाची जमीन रेल्वे प्रशासनाकडे आहे. याचा गैरफायदा रेल्वे प्रशासन घेत आहे. ठाणे स्टेशनचे विकेंद्रीकरण करण्यासाठी अनेक वर्षे प्रलंबित कळवा ऐरोली लिंकचे काम पूर्ण केल्यास ठाण्याच्या १०-११ फालाटांची गरजच भासणार नाही आहे. मुंबईसाठी लोकल, मेट्रो, बस सेवा, एसटी, मोनोरेल यांचे एकच प्राधिकरण हवे आणि मुंबई लोकल ही भारतीय रेल्वेपासून वेगळी झाल्याशिवाय मुंबईकरांचे हाल संपणार नाहीत. मुंबई रेल प्रवासी संघ प्रशासनाचा निषेध करते. - सिद्धेश देसाई, सरचिटणीस, मुंबई रेल प्रवासी संघ चर्चा का करत नाहीएका दिवसात १० लोकल ट्रेन रद्द झाल्या तरी प्रवाशांना प्रचंड त्रास होतो. मग ९३० फेऱ्या रद्द म्हणजे काय भयानक परिस्थिती होईल. या तीन दिवसांत मेगाब्लॉकसाठी इतर वाहतूक सोयीसुविधा पर्यायी व्यवस्था काय करण्यात आली आहे? याचा कुठेच उल्लेख दिसत नाही आहे. रेल्वे प्रशासनाकडून कोणत्याही प्रवासी संघटनांना विश्वासात न घेता/चर्चा न करता ३ दिवसाचा मेगाब्लॉक घेतला आहे. 

या मेगाब्लॉकमुळे लाखो नोकरदारांना त्रास होणार असेल तर राज्य शासनाकडून विशेष रजा घोषित करायला हवी. प्रवासी  संघटनांकडून प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत जनजागृती करायला हवी. जेणेकरून लोकांचे होणार नाही.  मुंबई शहर आणि उपनगरातील सर्व प्रवासी संघटनांकडून परिपत्रक काढून लोकांना प्रवास टाळण्याचे आवाहन उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाकडून करण्यात आले आहे. - लता अरगडे, अध्यक्ष, तेजस्विनी महिला रेल्वे प्रवासी संघटना विशेष लोकल सोडानागरिकांना महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जाण्याकरता विशेष लोकल सोडण्यात याव्यात. तसेच त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत; त्या अडचणी दूर करण्यासाठी एक रेल्वे हेल्पलाइन नंबर आहे तो जाहीर करावा. नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यात यावे. - राजू कांबळे, प्रमुख, कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघ पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण होईल?ज्या गतीने हे काम सुरू आहे ते बघता ( दोन महिन्यावर आलेल्या ) पावसाळ्यापूर्वी फलाट रुंदीकरणाचे काम पूर्ण झाले तरी रूंद केलेल्या भागावर छप्पर तयार करण्याचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण  होण्याची शक्यता नाही. अशा परिस्थितीत प्रवाशांचे हाल होतील. प्रवाशांची गैरसोय होवू नये यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने काम केले पाहिजे. - नंदकुमार देशमुख, अध्यक्ष, फेडरेशन ऑफ सबअर्बन रेल्वे यात्री संघ चेंगराचेंगरी होईलमुंबईत जोपर्यंत सर्वच गर्दीच्या ठिकाणचे अरुंद पादचारी  पूल रुंद होत नाहीत व जास्तीत जास्त सरकते जिने लागत नाहीत तोपर्यंत प्रवाशांना गर्दीच्या वेळी चेंगराचेंगरीचा सामना करावाचा लागणार. रेल्वे वाढविल्यास हे प्रश्न प्रामुख्याने रेल्वेला सोडवावे लागणार. बऱ्याच ठिकाणी सरकते जिने अभ्यास न करताच लावले गेलेले आहेत. त्यात आता ब्लॉक लोकांना त्रास देणार आहे. - दिनेश हळदणकर, रेल्वे प्रवासी ब्लॉकची घोषणा करादीर्घकालीन सुधारणा करण्यासाठी रेल्वेकडून तीन दिवसांचा ब्लॉक घेण्यात आला आहे. रेल्वे प्रवाशांची भविष्यात गैरसोय होऊ नये म्हणून या सुधारणा केल्या जात आहेत. कार्यालयांनी मुंबईकरांना घरून काम करण्याची परवानगी द्यावी. रेल्वे प्रत्येक रेल्वे स्थानकांवर ब्लॉकची घोषणा करावी. जेणेकरून प्रवाशांना याची माहिती होईल. - केतन शाह, सदस्य, झेडआरयूसीसी

टॅग्स :मुंबईमध्य रेल्वे