Join us  

ओला-उबर चालकांचा अचानक रेलरोको; ८ जणांवर गुन्हे दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2018 4:04 AM

प्रलंबित मागण्यांसाठी ओला-उबर चालकांनी पश्चिम रेल्वेवरील दादर रेल्वे स्थानकात मंगळवारी सकाळी ऐन गर्दीच्या वेळी रेलरोको केला. यामुळे पश्चिम रेल्वेवरील लोकल फेऱ्या सकाळच्या सुमारास सुमारे १० ते १५ मिनिटे विलंबाने धावत होत्या.

मुंबई : प्रलंबित मागण्यांसाठी ओला-उबर चालकांनी पश्चिम रेल्वेवरील दादर रेल्वे स्थानकात मंगळवारी सकाळी ऐन गर्दीच्या वेळी रेलरोको केला. यामुळे पश्चिम रेल्वेवरील लोकल फेऱ्या सकाळच्या सुमारास सुमारे १० ते १५ मिनिटे विलंबाने धावत होत्या.संप करूनही ओला-उबर चालकांच्या मागण्या मान्य न झाल्याच्या रागात प्रलंबित मागण्यांसाठी, दलित युथ पँथर संघटनेच्या नेतृत्वाखाली सुमारे २० ते २५ ओला-उबर चालकांनी सकाळी १० वाजून ३० मनिटे ते १० वाजून ३८ मिनिटे या काळात दादर रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक २ वरील रुळांवर उतरून रेलरोको केला. मात्र, स्थानकातील रेल्वे पोलिसांसह रेल्वे सुरक्षा बल यांनी त्वरित आंदोलनकर्त्यांना रेल्वे रुळावरून दूर करत लोकलसाठी मार्ग मोकळा करून दिला. आंदोलनकर्त्यांपैकी भाई जाधव, राहुल सोलंकी, रोहित भंडारे, सागर कोतुर, इर्शाद शेख, शिरराज खान, मौसिक पटेल आणि अंकित मोर्या अशा ८ जणांवर गुन्हे दाखल करत त्यांना अटक केल्याची माहिती मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांनी दिली.दादर येथील रेलरोको प्रकरणी महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचा कोणताही संबंध नसल्याचे संघाचे सरचिटणीस गोविंद मोहिते यांनी सांगितले. तत्पूर्वी सकाळी झालेल्या रेलरोकोमुळे पश्चिम रेल्वेवरील लोकल विलंबाने धावत असल्याने मुंबईकर प्रवाशांना फटका बसला.

टॅग्स :ओलाउबर