मुंबई : सॅण्डहर्स्ट रोड स्थानकालगतची थोरात हाऊस रेल्वेसाठी धोकादायक ठरल्यानंतर ही इमारत पाडण्याचा निर्णय रेल्वे, पालिका आणि म्हाडाने घेतला. मात्र रुळालगत अशा बऱ्याच जुन्या इमारती असून त्यांचा सर्व्हे करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. या सर्व्हेला लवकरच सुरुवात केली जाणार आहे. सॅण्डहर्स्ट रोड स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकच्या लगतच १९४० सालच्या पूर्वीचे अधिकृत थोरात हाऊस उभे होते. या हाऊस आणि रुळाच्या मध्येच भिंत असून गेल्या आठवड्याभरात पडणाऱ्या पावसात ती दोन वेळा कोसळली. थोरात हाऊसचीच असणारी ही भिंत आणि खुद्द थोरात हाऊसच धोकादायक झाल्यामुळे मध्य रेल्वे, म्हाडा आणि पालिकेने ही इमारतच पाडण्याचा निर्णय घेतला. शनिवार रात्रीपासून थोरात हाऊस पाडण्याचे सुरू केलेले काम सोमवारी पहाटे पूर्ण करण्यात आले. मात्र अशा अनेक इंग्रज काळापासूनच्या इमारती रेल्वे रुळालगत असून त्या धोकादायक अवस्थेत आहेत. त्या कधीही रेल्वेच्या हद्दीत कोसळल्यास मोठा अपघात होऊ शकतो. ही शक्यता पडताळून पाहता मध्य रेल्वेने पालिकेच्या सहकार्याने जुन्या इमारतींचा सर्व्हेच करण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेच्या मेन लाइनबरोबरच हार्बर मार्गावरीलही जुन्या पण धोकादायक इमारतींचा सर्व्हे केला जाणार आहे. यामध्ये सीएसटी ते दादर आणि सीएसटी ते कुर्ला दरम्यानच्या इमारतींचा समावेश असेल. अशा जुन्या इमारती अधिकृत असो वा अनधिकृत. मात्र त्या रेल्वेसाठी धोकादायक ठरल्यास त्या नक्की पाडण्यात येतील, असेही रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. १९९० साली राज्य शासनाचा असा कायदा झाला होता की रेल्वेच्या हद्दीत अशा इमारती उभ्या राहू शकत नाहीत. तरीही अशा अनेक इमारती उभ्या राहिलेल्या आहेत. तसेच अनधिकृत झोपड्याही आहेत. (प्रतिनिधी)
रुळालगतच्या जुन्या इमारतींचा रेल्वेला धोका
By admin | Updated: July 15, 2014 01:00 IST