मुंबई : आयआरसीटीसीतर्फे पाण्याच्या बॉटलचे उत्पादन करणारा रेल्वेचा सर्वात मोठा प्लांट अंबरनाथमध्ये उभारण्यात आला आहे. या प्लांटमधून दिवसाला २ लाख ‘रेल्वे नीर’ बॉटलचे उत्पादन होणार आहे. रेल्वे मंत्री सदानंद गौडा यांच्या हस्ते १३ आॅगस्टला या बॉटल प्लांटचे उद्घाटन होईल, असे आयआरसीटीसीने सांगितले. रेल्वे नीर हे भारतीय रेल्वेचे मिनरल वॉटरसारखेच स्वत:च्या मालकीचे उत्पादन आहे. सध्या महाराष्ट्रात असा कुठेही प्लांट नसून रेल्वे स्टॉल आणि लांब पल्ल्याच्या गाड्यात मिळणाऱ्या नीर बॉटल या नीरच्या इतर प्लांटमधून महाराष्ट्रात येतात. त्यामुळे असा प्लांट महाराष्ट्रात झाल्यास सहजसोप्या पध्दतीने या बॉटल लांब पल्ल्याच्या गाड्या आणि स्थानकांमध्ये मिळण्याबरोबरच रोजगारही उपलब्ध होईल, असे त्यामागचा उद्देश होता. त्यामुळे अंबरनाथ येथे रेल्वे नीर प्लांट उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. हा प्लांट सेन्चुरी जुना रेल्वे टँक येथे म्हणजे जीआयपीआर (ग्रेट इंडियन पेनिसुलर रेल्वे) डॅम मलंग हिल्स येथे उभारण्यात आला आहे. २0 हजार स्क्वेअर मीटरपर्यंत पसरलेल्या या प्लांटचे बांधकाम हे ३,५00 स्क्वेअर मीटर परिसरात केल्याचे सूत्रांनी सांगितले. या प्लांटमधून दिवसाला २ लाख पाण्याच्या बाटल्यांचे उत्पादन होणार आहे. त्याचप्रमाणे नाशिक आणि नागपूर येथे आणखी दोन नीर प्लांट रेल्वेकडून उभारण्यात येणार असून प्रत्येकाची किंमत आठ कोटी रुपये असेल. जून २0१५ पर्यंत या प्लांटचे काम पूर्ण करण्यात येईल.
अंबरनाथमध्ये रेल्वेचा नीर प्लांट
By admin | Updated: August 13, 2014 00:13 IST