Join us

‘रेल होस्टेस’ दिवाळीच्या मुहूर्तावर अवतरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 02:40 IST

नमस्ते, भारतीय रेल में आपका स्वागत है... असे सुमधुर शब्दांत रेल्वे एक्स्प्रेसमध्ये स्वागत केल्यास त्याचे नवल वाटायला नको.

महेश चेमटे ।मुंबई : नमस्ते, भारतीय रेल में आपका स्वागत है... असे सुमधुर शब्दांत रेल्वे एक्स्प्रेसमध्ये स्वागत केल्यास त्याचे नवल वाटायला नको. येत्या दिवाळीच्या मुहूर्तावर तेजस एक्स्प्रेसमध्ये रेल होस्टेस अर्थात रेल सुंदरीचे आदरातिथ्य मिळण्याचे संकेत मिळत आहेत. इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी)च्या सूत्रांनी ही माहिती दिली. प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणाºया संकल्पनेवर तेजस एक्स्प्रेसमध्ये ६ रेल होस्टेस प्रवाशांचे स्वागत करणार आहे.विमानातील सुखद आणि गारेगार प्रवासाचा आनंद घेता यावा, यासाठी विमानाच्या धर्तीवर रेल्वे मंत्रालयाने तेजस एक्स्प्रेसची निर्मिती केली. मुंबई-करमळी मार्गावर चालणारी तेजस एक्स्प्रेस अल्पावधीत लोकप्रिय ठरली. तेजसच्या प्रवाशांना दर्जेदार सुविधा मिळण्यासाठी इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशनतर्फे (आयआरसीटीसी) विशेष उपाययोजना करण्यात येत आहे.विमानातील एअर होस्टेस अर्थात हवाई सुंदरीच्या धर्तीवर मध्य रेल्वेवरदेखील ‘रेल होस्टेस’ अर्थात ‘रेल सुंदरी’ ही संकल्पना राबविण्यात येणार आहे.सप्टेंबरपर्यंत या संकल्पनेचा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास दिवाळीच्या मुहूर्तावर तेजस एक्स्प्रेसमधील प्रवाशांना ‘रेल होस्टेस’च्या आदरातिथ्याचा अनुभव घेता येणार आहे. तेजस एक्स्प्रेसमधील दोन डब्यांसाठी एक ‘रेल सुंदरी’ची नेमणूक करण्यात येईल. १२ डब्यांमध्ये ६ रेल सुंदरी प्रस्तावित आहेत. प्रस्ताव मंजूर झाल्यास रेल होस्टेसची नेमणूक करण्यात येणार आहे. यावर प्रवाशांच्या हरकती आणि सूचना मागविण्यात येणार आहेत. ही संकल्पना यशस्वी झाल्यास भविष्यात प्रत्येक डब्यासाठी एक रेल सुंदरी नेमण्याचा विचार करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.एकंदरीत भारतीय रेल्वेचा तेजसच्या माध्यमाने कायापालट झाल्याचे दिसून आले. त्याचबरोबर एक्स्प्रेमध्ये नवनवीन होणाºया प्रवाशीभिमुख प्रयोगामुळे ‘रेल बढे, देश बढे’ ही संकल्पना आकार घेत असल्याचे दिसून येत आहे.