मुंबई : येत्या २६ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या रेल्वे अर्थसंकल्पाकडे सगळ्यांच्या नजरा लागून असून हा अर्थसंकल्प देशभरात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यासाठी सोशल मिडीयाचा अधिक वापर करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. अर्थसंकल्प जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी व्टिटर आणि यु-ट्यूबचा वापर रेल्वे मंत्रालयाकडून केला जाणार आहे. रेल्वेतील सूत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार, रेल्वे अर्थसंकल्प सादर होताना रेल्वे अर्थसंकल्पातील प्रत्येक माहीती ही व्टिटरवरही येत राहिल. यासाठी एक टिम नेमण्यात आली असून ती व्टिट करण्यात मदत करणार असल्याचे सांगण्यात आले. त्याचप्रमाणे यु-ट्यूबवरही थेट प्रक्षेपण अर्थसंकल्पाचे होणार असून यु-ट्यूबवर रेल्वे मंत्री बजेट म्हणून सर्च केल्यानंतर हे प्रक्षेपण पाहण्यास मिळेल. यात आणखी एक बदल करण्याचा विचार रेल्वे मंत्रालय करत असून अर्थसंकल्प झाल्यानंतर रेल्वे मंत्री जनतेशी थेट संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहेत. यावर अद्याप अखेरचा निर्णय झाला नसून लवकरच निर्णय होईल, असे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)