अलिबाग : कमालीच्या उकाड्याने हैराण झालेल्या रायगडकरांना गेल्या दोन दिवसांपासून थंडीची चाहूल लागली आहे. वातावरणातील तापमान १८ अंश सेल्सियसवर आल्याने जिल्ह्याचा पारा चांगलाच खाली आहे. त्यामुळे कडीकपाटात गेलेले स्वेटर, मफलर बाहेर निघाले असून संध्याकाळच्यावेळी शेकोटीकडे नागरिकांचा मोर्चा वळत आहे. पावसाळ््यानंतर आॅक्टोबर हीटमुळे प्रचंड प्रमाणात वातावरण तापले होते. त्यामुळे उष्म्याचे प्रमाण वाढले होते. डिसेंबर उजाडला तरी, थंडीच्या मोसमाला सुरुवात झाली नव्हती. सुमारे २७ ते ३३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद होत असल्यामुळे सर्वजण हैराण झाले होते. मात्र गेल्या दोन दिवसांपासून उष्म्याचा पारा खाली आला आहे. त्यामुळे थंडीला सुरुवात झाली आहे. सकाळ आणि सायंकाळनंतर थंड हवा वाहत असल्याने वातावरण आल्हाददायक बनले आहे. या थंडीची चाहूल लागल्याने स्वेटर, स्कार्फ, मफलर खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी वाढत असल्याचे येथील स्थानिक व्यावसायिकाने सांगितले. सकाळी आणि सायंकाळी वॉक करणाऱ्यांचीही संख्या वाढत असल्याचे दिसून येते. अलिबाग, मुरुड आणि माथेरान हे पर्यटकांचे आवडते ठिकाण असल्याने त्यांचीही संख्या येथे वाढत आहे. (प्रतिनिधी)
रायगडकरांनी पांघरली दुलई
By admin | Updated: December 7, 2014 22:59 IST