मुंबई : दिवाळी म्हणजे रांगोळी, रोषणाई, नवीन कपडे, फराळ आणि फटाक्यांची आतषबाजी. मात्र ज्यांच्या शौर्यामुळे आज आपण दिवाळी साजरी करतो त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाला आणि असंख्य मावळ्यांच्या बलिदानाला आपण विसरत चाललो आहोत. गतवर्षी ऐन दिवाळीत वीज बिल न भरल्याने ‘किल्ले रायगड’वरील वीज खंडित करण्यात आली होती. परंतु यंदा अवघ्या महाराष्ट्राचे मंदिर असलेले किल्ले रायगड मशालींच्या प्रकाशात उजळून काढण्यासाठी असंख्य शिवभक्त सज्ज झाले आहेत.दरवर्षी श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज रायगड यांच्या वतीने तिथीनुसार किल्ले रायगडावर महाराजांचा राज्याभिषेक सोहळा उत्साहात पार पडतो. याच संस्थेच्या वतीने किल्ले रायगडावर ‘शिवचैतन्य सोहळा’ कार्यक्रम होणार असून या उत्सवाचे हे चौथे वर्ष आहे. विशेष म्हणजे शिवराज्याभिषेकानंतरचे हे ३४३ वे वर्ष असून ७ नोव्हेंबरच्या रात्री ‘एक व्यक्ती एक मशाल’ याप्रमाणे ३४३ मशाली प्रज्वलित करण्यात येतील. तसेच मशालींच्या उजेडात महाराजांची पालखी मिरवणूकही निघेल.या सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील व बाहेरील शिवभक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती राहणार असून सर्व शिवभक्तांच्या एकवेळच्या जेवणाची व न्याहरीची व्यवस्था आयोजकांकडून करण्यात येणार आहे. तसेच ७ नोव्हेंबरला रात्री ८ वाजल्यापासून सांस्कृतिक कार्यक्रम रंगणार असून मध्यरात्री १२ वाजता मशाली पेटविण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)दिवाळीत मोठ्या प्रमाणात वायफळ खर्च होतो. ज्यांच्या पराक्रमामुळे आपण आज आनंद घेतो त्यांचा आपल्याला विसर पडतोय. फटाके उडवून हजारो रुपये धुरामध्ये घालवण्यापेक्षा एक रात्र किल्ले रायगड उजळवण्यासाठी सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आयोजकांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केले.कार्यक्रम वेळापत्रक :७ नोव्हें.२०१५ - सकाळी ११ वाजता जागोजागी मशाली लावण्यात येतील.सायं. ८ ते ९ - स्नेहभोजनरात्री १२ पर्यंत - सांस्कृतिक कार्यक्रमरात्री १२ वाजता - मशाल प्रज्वलन व पालखी मिरवणूक
मशालींच्या प्रकाशात उजळणार किल्ले रायगड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2015 01:36 IST