Join us
Daily Top 2Weekly Top 5

रायगड जिल्ह्याला सामाजिक परिवर्तनाचाही इतिहास - शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:30 IST

रायगड जिल्ह्याला सामाजिक परिवर्तनाचाही इतिहासशरद पवार : स्वातंत्र्यवीर हरी नारायण देशमुख यांच्या पुस्तकाचे प्रकाशनलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई ...

रायगड जिल्ह्याला सामाजिक परिवर्तनाचाही इतिहास

शरद पवार : स्वातंत्र्यवीर हरी नारायण देशमुख यांच्या पुस्तकाचे प्रकाशन

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : गांधीजींच्या भारत छोडो या चळवळीतून प्रेरणा घेऊन तेव्हाच्या कुलाबा आणि आजच्या रायगड जिल्ह्याने स्वातंत्र्यचळवळीत भाग घेतला. रायगडमधील भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांना फाशी देण्यात आली होती. त्यानंतर ही चळवळ थांबेल, असे ब्रिटिशांना वाटत होते. मात्र जिल्ह्यातील लोकांनी हार मानली नाही. रायगडचे वैशिष्ट्य असे की, एखादे काम हाती घेतले असताना कुणी अडथळे आणले तरी थांबायचे नाही. या जिल्ह्याला सामाजिक परिवर्तनाचादेखील इतिहास आहे, असे उद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी काढले.

स्वातंत्र्यवीर हरी नारायण देशमुख यांच्यावरील ‘सेनापती’ या पुस्तकाचे बुधवारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात शरद पवार यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या वेळी पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते खासदार सुनील तटकरे, प्रमोद हिंदूराव आणि पुस्तकाचे लेखक एकनाथ देसले उपस्थित होते. काही लोक स्वातंत्र्यापूर्वी देशासाठी लढले, कष्ट केले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी काम करा, या गांधीजींनी दिलेल्या संदेशानुसार काही लोकांनी काम केले. अशा आगळ्यावेगळ्या व्यक्तिमत्त्वांमध्ये हरी नारायण देशमुख यांचे नाव घेतले तर अतिशयोक्ती होणार नाही. स्वातंत्र्यचळवळीत त्यांनी काम केले, गांधीजींपासून त्यांनी प्रेरणा घेतली. भाई कोतवाल यांच्यासोबत ते होते. समाजातील शेवटच्या माणसाच्या डोळ्यांतील अश्रू पुसण्यासाठी स्वातंत्र्य हवे, हा गांधीजींचा विचार कृतीमध्ये आणण्यासाठी देशमुख यांनी काम केले, असे पवार म्हणाले.

देशमुख यांनी सरपंच पद ते जिल्हा परिषदेच्या सभापती पदापर्यंत मजल मारली. रायगडमध्ये शेकापची ताकद असूनही देशमुख यांच्या कामाकडे पाहून त्यांची सभापती पदावर बिनविरोध निवड केली होती. अतिशय उत्तम पद्धतीने त्यांनी अखेरपर्यंत काम केले. दुग्धव्यवसाय वाढविणे, सहकारी संस्था निर्माण करणे, शिक्षणाला चालना देणे अशा विविध क्षेत्रांत त्यांनी काम केल्याचेही पवार यांनी सांगितले. या वेळी सुनील तटकरे, प्रमोद हिंदूराव यांचीही भाषणे झाली.

...................