Join us
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील दाेन हुक्का पार्लरवर छापे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाण्यातील दोन वेगवेगळ्या हुक्का पार्लरवर गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एक तसेच अनैतिक मानवी वाहतूक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : ठाण्यातील दोन वेगवेगळ्या हुक्का पार्लरवर गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एक तसेच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने छापे टाकले. तर अंमली पदार्थविरोधी पथकानेही शनिवारी रात्री छापा टाकला. या कारवाईमध्ये ४९ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

काेराेनाचा संसर्ग वाढण्याच्या भीतीने रात्रीची संचारबंदी लागू केलेली आहे. मात्र, ठाणे आणि भिवंडीत हुक्का पार्लरमध्ये तरुण-तरुणी नशा करत असल्याची माहिती पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांना मिळाली होती. त्याआधारे अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय येनपुरे, उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्या आदेशाने युनिट एकचे सहायक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल जाधव आणि संदीप चव्हाण तसेच राबोडी पोलिसांनी संयुक्त कारवाई करून २६ डिसेंबरला रात्री ११ वाजता राबोडीतील ‘फिल्टर रेस्टॉरंट व हुक्का पार्लर’ येथे कारवाई केली. या पार्लरचे कर्मचारी आणि काही ग्राहक अशा १४ जणांविरुद्ध ‘कोप्ता’अंतर्गत कारवाई करण्यात आली.

कापूरबावडी भागातील लोढा कॉम्प्लेक्सजवळील सेवा रस्त्यावर असलेल्या ‘३६० हुक्का पार्लर’ येथे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलग यांच्या पथकाने शनिवारी रात्री ९.३०च्या सुमारास छापा टाकला. या हुक्का पार्लरमधील ग्राहक, मालक आणि कामगार अशा २९ जणांविरुद्ध सिगरेट व अन्य तंबाखूजन्य पदार्थ अधिनियमाचे कलम ५/२१ प्रमाणे कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

भिवंडीत सहा जणांना घेतले ताब्यात

भिवंडीतील ‘मूनलाइट धाबा’ या ठिकाणच्या हुक्का पार्लरवर कारवाई केली. या कारवाईत तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करणाऱ्या सहा जणांना ताब्यात घेण्यात आले. जागा उपलब्ध करून देणारे ढाबा चालक रोशन मलिक (२०) यांच्याविरुद्ध तंबाखूजन्य हुक्का सेवनाचा पदार्थ पुरवल्याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या ठिकाणी हुक्का सेवनाची २५ हजारांची सामग्री जप्त केली आहे.