Join us
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका सभागृहाबाहेर राडा

By admin | Updated: March 13, 2015 01:23 IST

असमान निधी वाटपावरून सत्ताधारी शिवसेना-भाजपा युती आणि विरोधी पक्षामध्ये सुरू असलेली धुमश्चक्री सलग तिसऱ्या दिवशी सुरू राहिली़ बोळे फेकल्याप्रकरणी

मुंबई : असमान निधी वाटपावरून सत्ताधारी शिवसेना-भाजपा युती आणि विरोधी पक्षामध्ये सुरू असलेली धुमश्चक्री सलग तिसऱ्या दिवशी सुरू राहिली़ बोळे फेकल्याप्रकरणी विरोधी पक्षनेत्यांनी दिलगिरी व्यक्त करूनही महापौर स्नेहल आंबेकर यांनी आडमुठे धोरण अवलंबिले़, तर काँग्रेसच्या निलंबित नगरसेविकांनी कडेकोट बंदोबस्तातही सभागृहात घुसण्याचा प्रयत्न केला़ यासाठी त्यांनी चक्क सभागृहाच्या दारावर लाथा मारण्यास सुरुवात केल्यामुळे सुरक्षारक्षक व त्यांच्यामध्ये चकमक उडाली़ त्यामुळे सभागृहाला लाज आणणाऱ्या या घटनेच्या चौकशीची मागणी महापौरांनी दिली आहे़सोमवारपासून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेऊन सत्ताधाऱ्यांच्या नाकात चांगलाच दम आणला़ मात्र यामधील काँग्रेसच्या सहा गोंधळी नगरसेविकांना महापौरांनी १५ दिवसांसाठी निलंबित केले़ त्यामुळे गटनेत्यांच्या बैठकीत याबाबत समझोता करीत विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी सभागृहात दिलगिरी व्यक्त केली़ मात्र ऐनवेळी महापौरांनी घूमजाव करीत काँग्रेस नगरसेविकांचे निलंबन रद्द करण्यास टाळाटाळ सुरू केली़ यामुळे संतप्त विरोधी पक्षांनी घोषणाबाजी व निदर्शने सुरू केली़ त्यास सत्ताधारी पक्षानेही प्रत्युत्तर देत सभागृहात गोंधळ घातला़ त्यामुळे अर्थसंकल्पीय भाषणाची सभा गुंडाळून महापौरांनी स्वाइन फ्लूवर विशेष बैठक सुरू केली़ त्यातही मनसेने स्वाइन फ्लूसाठी भाजपा सरकारला जबाबदार धरल्याने सभागृहात पुन्हा तणाव पसरला़ हा गोंधळ शांत करण्यासाठी महापौरांनी दहा मिनिटांसाठी सभागृह तहकूब केले़ त्याचवेळी निलंबित नगरसेविकांनी सभागृहात घुसण्याचा प्रयत्न केला़ त्यांना रोखण्यासाठी शिवसेनेने ६० ते ७० सुरक्षारक्षक सभागृहाबाहेर तैनात ठेवले होते़ दारावर लाथा मारणाऱ्या नगरसेविकांना सुरक्षारक्षकांनी खेचण्यास सुरुवात केली़ यात महिला सुरक्षारक्षक आणि नगरसेविकांमध्ये बाचाबाची झाली़ त्यामुळे लोकशाही मार्गाने जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी असलेल्या सभागृहाचा आज हाणामारीचा आखाडा झाला होता़ (प्रतिनिधी)