Join us

मुंबई काँग्रेसमध्ये राडा सुरुच

By admin | Updated: February 3, 2017 01:36 IST

उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस उजाडला तरी मुंबई काँग्रेसमधील सुंदोपसुंदी संपण्याची कोणतीच चिन्हे नाहीत. मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम

मुंबई : उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस उजाडला तरी मुंबई काँग्रेसमधील सुंदोपसुंदी संपण्याची कोणतीच चिन्हे नाहीत. मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम विरुद्ध गुरुदास कामत गटातील संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. दोन्ही गटातील वादात मध्यस्थी करण्यासाठी गुरुवारी जुहू येथील एका क्लबमध्ये बोलावण्यात आलेल्या बैठकीतच दोन्ही बाजूचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. यावेळी काही कार्यकर्त्यांमध्ये हाणमारीही झाली. यात एक कार्यकर्ता जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. निरूपम यांच्यावर नकारात्मक कार्यशैलीचा ठपका ठेवत गुरूदास कामत यांनी महानगरपालिकेच्या निवडणूक प्रक्रियेपासून अलिप्त राहणार असल्याचे जाहीर केले होते. या वादावर तोडगा काढण्यासाठी पक्षश्रेष्ठींनी दिल्लीतून भूपिंदरसिंग हुड्डा यांना पाठवले होते. मात्र, काही दिवसांपूर्वी झालेली ही बैठक निष्फळ ठरली होती. त्यानंतर गुरुवारी भूपिंदरसिंग हुडा यांनी जुहूच्या हॉटेलमध्ये पुन्हा एकदा दोन्ही नेत्यांना मध्यस्थीसाठी पाचारण केले होते. मात्र, यावेळी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली आणि कार्यकर्ते समोरासमोर भिडले. तिकीट वाटपात गुरुदास कामत यांच्या उत्तर -पश्चिम मतदारसंघातील प्रभागात एकालाही तिकीट देण्यात आले नव्हते. तसेच कांदिवलीमध्ये राहणा-यांना चारकोपमधून उमेदवारी देण्यात आली आहे. या यादीवर निरुपम गटाचेच वर्चस्व असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या वादामुळे आतापर्यंत ७ नगरसेवकांनी पक्षाला सोडचिट्ठी दिली आहे.दरम्यान, मुंबई काँग्रेसमधील या गोंधळामुळे पक्षाकडून जाहीर करण्यात आलेली पहिली उमेदवारी यादीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. पहिली यादी स्थगित करण्याचे वृत्त सर्वत्र पसरले असताना संजय निरुपम यांनी मात्र यादी रद्द झाली नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, दुसरी यादी कधी प्रकाशित होणार आणि त्यात किती उमेदवारांचा समावेश असणार याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले नाही. (प्रतिनिधी)नगरसेवकांच्या कुटुंबियांनाच तिकीटेमुंबई काँग्रेसकडून मंगळवारी ११५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली होती. यामध्ये विरोधी पक्षनेत्यासह १९ नगरसेवकांना पुन्हा संधी देण्यात आली. तर, ९६ नवीन चेहरे असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले होते. मात्र, आता या यादीत काँग्रेसमधील प्रस्थापित नेत्यांच्या नातेवाईकांनाच संधी देण्यात आल्याचा आरोप होत आहे. यादीत आजी-माजी नगरसेवकांच्या पत्नी, वहिनी, मुलगी आणि मुलगा यांचा भरणा आहे. पक्षातील अंतर्गत वाद आणि बंडखोरी थोपविण्यासाठी आजी-माजी नगरसेवकांच्या कुटुंबातच तिकीटे देण्यात आल्याची चर्चा आहे.