मुंबई : मुंबईतील रेसकोर्सच्या जागेवर हेलीपोर्ट उभे करण्याच्या शासनाच्या निर्णयाला शिवसेनेने कोलदांडा दिला असून त्याजागी लंडनचे ‘हाइड पार्क’, न्यूयॉर्कचे ‘सेंट्रल पार्क’ यांच्याप्रमाणे मध्यवर्ती भव्य सुंदर उद्यान उभे करण्याची योजना आखली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना वर्षभरापूर्वीच याचा आराखडा दिला होता मात्र तो डावलून हेलीपोर्ट उभे केल्यास शिवसेना शासनाचा हा प्रयत्न हाणून पाडेल, असा इशाराही शिवसेनेने दिला आहे.येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत हा प्रचाराचा मुद्दा बनविण्याच्या दृष्टीने शिवसेना कामाला लागली असून या अद्ययावत उद्यानाचे रेखाचित्रदेखील शिवसेनेने जारी केले आहे. रेसकोर्सची २२२ एकर जमीन आहे. या ठिकाणी चार हेलीपॅड्स, ६०० मीटर लांबीची धावपट्टी, अग्निशमन केंद्र, रात्री हेलीपॅड उतरण्याची सुविधा, दोन विश्रामगृहे उभारण्याचा प्रस्ताव शासनाने आखला आहे. रेसकोर्सच्या मोकळ्या जागेपैकी ११ एकर जमिनीवर ४२ कोटी रुपये खर्च करून ही योजना राबवली जाणार आहे. मात्र शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी तीव्र विरोध केला असून हा तर मिनी एअरपोर्ट उभारणारा प्रकल्प आहे, असे सांगून रेसकोर्सची जागा मुंबईकरांच्या मालकीची आहे. त्याची मालकी पालिकेकडे आहे, की शासनाकडे हा मुद्दा गौण आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी मोकळी राहिलेली ही जमीन मूठभर अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या येण्या-जाण्यासाठी बळकावणे शिवसेनेला मान्य नाही, असे म्हटले आहे. याविषयीचा प्रस्ताव शिवसेनेने एक वर्षापूर्वी मुख्यमंत्र्यांना दिला होता. ही योजना चांगली व सुंदर असल्याचे कौतुक मुख्यमंत्र्यांनी केले. मुंबईकरांच्या उद्यानाची जागा अती महत्त्वाच्या व्यक्तींसाठी का ठेवली जाते, असा सवालही शिवसेनेने उपस्थित केला आहे. (प्रतिनिधी)
रेसकोर्सवर होणार उद्यानच!
By admin | Updated: June 12, 2014 02:46 IST