Join us

नेस्को लसीकरण केंद्राबाहेर लागल्या पहाटेपासून रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:08 IST

महापौरांनी दिली अचानक भेटलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : नेस्को लसीकरण केंद्राबाहेर गुरुवारी पहाटेपासून रांगा लागल्या होत्या. विशेष म्हणजे ...

महापौरांनी दिली अचानक भेट

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : नेस्को लसीकरण केंद्राबाहेर गुरुवारी पहाटेपासून रांगा लागल्या होत्या. विशेष म्हणजे बुधवारी येथे लसीकरण बंद असल्याने गुरुवारी नेस्को लसीकरण केंद्राबाहेर प्रचंड गर्दी झाली होती. हब मॉलच्या पुढे १ किमीपर्यंत रांग होती. ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने लसीकरणासाठी आले होते. एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेला लॉकडाऊन सध्या सुरू आहे. मात्र, येथे लसीकरणासाठी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत दुसरीकडे कोरोनाला निमंत्रण दिल्याचे चित्र होते.

येथील गर्दीची दखल घेत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी गुरुवारी दुपारी साडेबारा वाजता नेस्को कोविड सेंटरला भेट दिली. सुमारे दीड तास महापौर येथे होत्या. त्यांनी लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांसह ज्येष्ठ नागरिक आणि येथील कर्मचाऱ्यांशी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या. तसेच नेस्को कोविड सेंटरच्या अधिष्ठाता डॉ. नीलम अंद्राडे यांच्याशीही चर्चा करून सूचना दिल्या.

दरम्यान, नेस्को कोविड सेंटर येथे लस घेण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या नागरिकांना मोफत पाण्याचे वाटप करण्यात आले. सर्व नागरिकांची महापाैरांसह सर्वांनी आस्थेने विचारपूस केली. यावेळी या उपक्रमात सहभागी असणाऱ्या दानशूर मित्रमंडळींचे व शिवसेना शाखा ५४ चे शाखाप्रमुख अजित भोगले व सर्व कार्यकर्त्यांचे महापौरांनी कौतुक करून आभार मानले.

लसीकरणासाठी ॲपवर पूर्वनोंदणी केलेल्या नागरिकांनी येथे यावे, रांगेत, उन्हात उभे राहू नये म्हणून गेटपासून सध्या असलेल्या शेडपर्यंत शेड बांधण्यात यावी, गर्दी टाळण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना सोमवार, मंगळवार व बुधवारी, तर ४५ ते ५९ वयोगटातील नागरिकांना उर्वरित लस कशी देता येईल याचे नियोजन करण्यात यावे, येथील कर्मचाऱ्यांनी नागरिकांशी सौजन्याने वागावे, अशा सूचना महापौरांनी यावेळी केल्या. यावेळी डॉ. नीलम अंद्राडे तसेच विधानसभा संघटक प्रवीण माईणकर, शाखाप्रमुख अजित भोगले, सिनेट सदस्य शशिकांत झोरे, युवासेनेचे अमोल अपरात व इतर शिवसैनिक उपस्थित होते.

दरम्यान, येथे पहिला डोस व दुसरा डोस घेण्यास येणाऱ्यांसाठी काही ठिकाणी एकच रांग असल्याने खूप गोंधळ उडत आहे व यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला असून यातून कोरोनाचा संक्रमण धोका अधिक असल्याचे जोगेश्वरी येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश हिरवे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

---------------------------------------------