Join us  

क्लस्टरप्रमाणे प्रत्येक महाविद्यालयासाठी आता प्रश्नसंच, मुंबई विद्यापीठाने केल्या मार्गदर्शक सूचना जारी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2020 6:19 AM

मुंबई विद्यापीठासह राज्यातील अनेक विद्यापीठे अंतिम वर्षाच्या परीक्षा आॅनलाइन एमसीक्यू पद्धतीने (वस्तूनिष्ठ बहुपर्यायी उत्तरे) घेणार आहेत.

मुंबई : उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या सूचनानंतर विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार मुंबई विद्यापीठाकडूनही संलग्नित महाविद्यालयांना प्रश्नसंच तयार करण्यासाठी, त्यांची काठिण्य पातळी कशी असावी तसेच कार्यवाही कशी करावी यासंदर्भातील मार्गदर्शन करण्यासाठी परिपत्रक जारी करण्यात आले आहे. महाविद्यालयांच्या क्लस्टरप्रमाणे प्रत्येक महाविद्यालयासाठी एक प्रश्नसंच अशाप्रकारे प्रश्नसंच तयार करण्याच्या सूचना यामध्ये देण्यात आल्या आहेत.मुंबई विद्यापीठासह राज्यातील अनेक विद्यापीठे अंतिम वर्षाच्या परीक्षा आॅनलाइन एमसीक्यू पद्धतीने (वस्तूनिष्ठ बहुपर्यायी उत्तरे) घेणार आहेत. मात्र एमसीक्यू पद्धतीचा विद्यार्थ्यांना अनुभव नसल्याने आणि परीक्षांच्या तयारीसाठीही वेळ नसल्याने विद्यार्थ्यांना प्रश्नपेढ्या, प्रश्नसंच पुरवावेत अशी मागणी युवासेना आणि इतर विद्यार्थी संघटनांकडून करण्यात आली होती. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनीही विद्यार्थ्यांना येत्या ३, ४ दिवसांत प्रश्नसंच देणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली होती.या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाकडून महाविद्यालयांना काही मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. १३ मार्चपर्यंत शिकविलेल्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नपेढ्या, प्रश्नसंच विविध महाविद्यालयांत राहणार असून त्यापैकी एक प्रश्नसंच विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिला जाईल. प्रत्येक प्रश्नसंचात ५० ते १०० प्रश्न असणार असून याचे पर्याय हे विद्यार्थ्यांचे गोंधळ वाढविणारे असू नयेत असे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.सोबतच परीक्षांचे वेळापत्रक तयार करताना महाविद्यालयांनी २ आॅक्टोबरसारख्या सार्वजनिक सुट्ट्या लक्षात ठेवूनच ते तयार करावे, असे ही पत्रकात नमूद करण्यात आले आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षांच्या प्रश्नसंचामुळे एकापेक्षा जास्त विषय शिकविणाऱ्या प्राध्यापकांना कामाचा अतिरिक्त ताण आला आहे. बहुपर्यायी प्रश्न काढताना ते अधिक अचूक व थेट असणे आवश्यक असते. यामुळे शिक्षकांना अधिक काळजीपूर्वक प्रश्नसंच तयार करावा लागत आहे. याबाबत विद्यापीठाने महाविद्यालयांना मार्गदर्शक सूचना द्याव्यात, अशी मागणी प्राध्यापकांकडून होत होती. त्यामुळे प्रश्नसंच, वेळापत्रक याबाबत कशी कार्यवाही करावी याबद्दल विद्यापीठाकडून परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

टॅग्स :मुंबई विद्यापीठ