Join us
Daily Top 2Weekly Top 5

पालिका शिक्षकांचा प्रश्न सुटेना

By admin | Updated: July 15, 2014 00:34 IST

पालिका शाळेत ठोक मानधनावर काम करणाऱ्या शिक्षकांची परवड अद्याप थांबलेली नाही. नेत्यांसह अधिकाऱ्यांकडे फेऱ्या मारूनही त्यांना सेवेत घेतले जात नाही

नवी मुंबई : पालिका शाळेत ठोक मानधनावर काम करणाऱ्या शिक्षकांची परवड अद्याप थांबलेली नाही. नेत्यांसह अधिकाऱ्यांकडे फेऱ्या मारूनही त्यांना सेवेत घेतले जात नाही. दुसरीकडे शिक्षकच नसल्यामुळे विद्यार्थ्यांचेही नुकसान होऊ लागले आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होवू नये यासाठी ठोक मानधनावर १२६ शिक्षक घेण्यात आले होते. जवळपास २०११ पासून हे शिक्षक अल्प वेतनावर विद्यादानाचे काम करत आहेत. पूर्वी त्यांना ५ हजार रुपये मानधन देण्यात येत होते. नंतर ते ७ हजार रुपये करण्यात आले आहे. तीन महिन्यांनी त्यांना नवीन नियुक्तीपत्र दिले जात होते. यावर्षी शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर त्यांना नियुक्तीपत्रच देण्यात आले नाही. काही शिक्षक मोफत विद्यादानाचे काम करत आहेत, तर काहीजण घरी बसून आहेत. शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शहरात कंत्राटी कामगारांपेक्षा कमी वेतन मिळणाऱ्या या शिक्षकांवर बेकारीची वेळ आली आहे. शाळा सुरू होवून एक महिना पूर्ण झाल्यानंतरही त्यांना ठोस काहीच सांगितले जात नाही. पालिकेने कायमस्वरूपी शिक्षक मिळावे यासाठी शासनाकडे पत्र पाठविले आहे. परंतु अद्याप शिक्षक मिळालेले नाहीत. यामुळे ठोक मानधनावरील शिक्षकांची नियुक्तीही थांबली आहे. मध्यंतरी जनता दरबारात पालकमंत्री गणेश नाईक यांनी वेतन ११ हजार करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. परंतु प्रत्यक्षात नोकरी गमावण्याची वेळ शिक्षकांवर आली आहे. शिक्षण अधिकारी हरूण आतार यांना याविषयी विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, या शिक्षकांना लवकरच नियुक्तीपत्र दिले जाणार असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)