Join us
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅक्वा इमॅजिकाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

By admin | Updated: May 28, 2015 22:55 IST

आंतरराष्ट्रीय दर्जाचे थीम पार्क अशी ओळख असणाऱ्या अ‍ॅॅक्वा इमॅजिकामध्ये मुंबईतील चार वर्षांच्या मुलीचा बुधवारी सायंकाळी बुडून मृत्यू झाला.

खालापूर : आंतरराष्ट्रीय दर्जाचे थीम पार्क अशी ओळख असणाऱ्या अ‍ॅॅक्वा इमॅजिकामध्ये मुंबईतील चार वर्षांच्या मुलीचा बुधवारी सायंकाळी बुडून मृत्यू झाला. यामुळे पुन्हा एकदा येथील पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. मुंबईतील अंधेरी, मरोळ येथील जैनाब मोईज बक्समसा (४) आपल्या आईसह अ‍ॅक्वा इमॅजिकामध्ये आली होती. पाण्यात पोहताना आईच्या हातातून जैनाबचा हात निसटल्याने ती गटांगळ्या खावू लागली. तिने लाइफ जॅकेटही न घातल्याचे समोर येत आहे. तिला खोपोलीतील डॉ. अमोल गोसावी यांच्या रुग्णालयात दाखल केले असता, उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. अ‍ॅक्वा इमॅजिकामध्ये मुलीचा बुडून मृत्यू झाल्याचे वृत्त कळताच कुटुंबीय व बोहरी समाजातील नागरिकांनी रुग्णालयाबाहेर गर्दी केली. जैनाब ही बक्समसा दांपत्याची एकुलती एक मुलगी होती. यावेळी दोषींवर कारवाई करण्याची मागणी जमावाने केली. तणाव वाढल्याने पोलिसांनी रुग्णालयाबाहेर बंदोबस्त ठेवला होता. पोलिसांनी कारवाईचे आश्वासन दिल्यावर जमाव शांत झाला. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भिती निर्माण झाली आहे.अंधेरीहून साठ महिलांचा एक ग्रुप आला होता. व्हेव पूल राईडमध्ये ही मुलगी एकटीच पाण्यात गेली आणि पाण्यात गटांगळ्या खाऊ लागली. लाइफ गार्डने तिला बाहेर काढले. अ‍ॅक्वा इमॅजिकामध्ये पर्यटकांनी सावधानता बाळगण्यासाठी जागोजागी सेफ्टी बोर्ड लावण्यात आले आहेत, तर लाइफ गार्डही तैनात आहेत. पोलिसांना तपासात पूर्ण सहकार्य करण्यात येईल तर अंतर्गत तपास करून यातील दोषी आढळला तर कारवाई नक्कीच केली जाईल. - आशुतोष काळे, सुरक्षा विभाग प्रमुख.