Join us
Daily Top 2Weekly Top 5

विझक्राफ्टच्या आराखड्यावर प्रश्नचिन्ह

By admin | Updated: February 19, 2016 03:25 IST

गिरगाव चौपाटीवर महाराष्ट्र रजनीच्या व्यासपीठाला लागलेल्या आगीप्रकरणी आता ‘विझक्राफ्ट’ वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे

मुंबई: गिरगाव चौपाटीवर महाराष्ट्र रजनीच्या व्यासपीठाला लागलेल्या आगीप्रकरणी आता ‘विझक्राफ्ट’ वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. ‘विझक्राफ्ट’ने महापालिकेला सादर केलेल्या कार्यक्रमाच्या आराखड्यात केवळ दोनच प्रवेशद्वारांचे नियोजन करण्यात आले होते. महापालिकेसह अग्निशमन दलाने मात्र हा आराखडा रद्द करत पाच प्रवेशद्वारांचा आराखडा बनवण्यास सांगितले. यामुळे कार्यक्रमावेळी आगीनंतर १० हजारांहून अधिक लोकांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले. मात्र यामुळे इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी ‘विझक्राफ्ट’च्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.चार दिवसांत याप्रकरणाचा अहवाल सादर होणे अपेक्षित होते. परंतु अजूनही आगीचा अहवाल सादर झालेला नाही. विझक्राफ्टच्या आराखड्यात पाच प्रवेशद्वार उभारण्यासह बॅरिकेट्स हटवण्याचे निर्देश पालिकेने दिले. जर या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीचा आधीचा आराखडा स्वीकारला असता, तर मोठी हानी होण्याचा धोका होता. पाहणी अधिकाऱ्यांची समय सुचकता आणि योग्य नियोजनामुळे धोका टळल्याचेच समोर येत आहे. याबाबत ‘विझक्राफ्ट’शी संपर्क साधण्याचा प्रयत्न करुनही त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. (प्रतिनिधी)