Join us

बीडीडीचा प्रश्न मार्गी लागला, आता आमच्याकडे थोडं लक्ष द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : वरळी कोळीवाड्यासाठी सरकारने एखादी स्पेशियल स्कीम ( डीसीआर अंतर्गत ) राबवून आमचा सर्वांगीण ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : वरळी कोळीवाड्यासाठी सरकारने एखादी स्पेशियल स्कीम ( डीसीआर अंतर्गत ) राबवून आमचा सर्वांगीण विकास करावा. विकासाची योजना करत असताना समाजातील सर्व स्तरांचा विचार करावा. कोणाचे नुकसान होऊ नये ही काळजी घ्यावी. वरळी गावातील सुशिक्षित, सामाजिक तसेच समाजाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला घेऊनच विकासाची योजना आखावी, अशी री आता ओढली जात आहे. बीडीडी चाळीचा पुनर्विकास हाती घेतल्यानंतर आता थोडे लक्ष वरळी कोळीवाड्याकडे देखील द्यावे, असे म्हणणे मांडले जात आहे.

वरळी कोळीवाडा हा मुंबईमधील सात बेटापैकी एक आहे. आम्ही कोळीवाड्याच्या विकासाची अनेक वर्षांपासून प्रतीक्षा करत आहोत. वरळीमध्ये असून देखील वरळी बीडीडी चाळ आणि वरळी कोळीवाडा हे एका नाण्याच्या दोन वेगवेगळ्या बाजू ठरत आहेत. एका ठिकाणी बीडीडी चाळमधील रहिवाशांमध्ये सर्व सुविधा आणि दुसरीकडे वरळी कोळीवाड्यामध्ये लोकांना आजपण १ किलोमीटरपर्यंत बससाठी चालत जावे लागत आहे. अरुंद रस्त्यामुळे टॅक्सी, रुग्णवाहिका आणि फायर ब्रिगेड देखील कोळीवाड्याच्या रस्त्यावर येऊ शकत नाही.

बाईक आणि कार पार्किंगसाठी काही व्यवस्था नाही. मुलांना खेळण्यासाठी मोठी मैदाने नाहीत. अभ्यासासाठी लायब्ररी नाही. वृद्ध नागरिकांसाठी पार्क नाहीत. अगोदर सी लिंक आणि आता कोस्टल रोडमुळे मासेमारीवर वाईट परिणाम झाला आहे. एक लाख लोकांची वस्ती असलेल्या वरळी कोळीवाड्याला अजूनपर्यंत मूलभूत सुविधा प्राप्त झालेल्या नाहीत. राज्यकर्त्यांनी फक्त आपला स्वतःचा विकास करून घेतला. परंतु समाजासाठी आणि रहिवाशांच्या विकासासाठी काही ठोस असे काम केले नाही, अशी खंत वरळी कोळीवाडा येथील डॉ. शरद वासुदेव कोळी यांनी व्यक्त केली असून, त्यांनी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र देखील लिहिले आहे.