Join us

‘माथेरानची राणी’ तूर्त सायडिंगलाच

By admin | Updated: December 28, 2016 03:43 IST

माथेरानची मिनी ट्रेन दोन वेळा रुळावरून घसरल्याच्या घटनेनंतर मे २0१६ पासून ट्रेनची सेवा सुरक्षेच्या कारणास्तव पर्यटकांसाठी बंद करण्यात आली. मात्र ही ट्रेन सुरू

मुंबई : माथेरानची मिनी ट्रेन दोन वेळा रुळावरून घसरल्याच्या घटनेनंतर मे २0१६ पासून ट्रेनची सेवा सुरक्षेच्या कारणास्तव पर्यटकांसाठी बंद करण्यात आली. मात्र ही ट्रेन सुरू करण्यासाठी मध्य रेल्वेकडून प्रयत्न केले जात असून त्यासाठी विभागीय रेल्वे व्यवस्थापक रवींद्र गोयल यांनी नुकताच पाहणी दौरा केला. रुळांची स्थिती व प्रवासी सुरक्षेच्या बाबींची पूर्तता करणे आवश्यक असून अनेक आव्हाने असल्याची माहिती गोयल यांनी दिली. ती पूर्ण केल्याशिवाय तरी माथेरान ट्रेन सध्या तरी सुरू करणे कठीण असल्याचे सांगितले. त्यामुळे माथेरानची मिनी ट्रेन काही महिने तरी सायडिंगलाच राहील, हे स्पष्ट झाले आहे. जानेवारी ते मेपर्यंत नेरळ ते माथेरान दरम्यान सहा विविध घटना घडल्या. यात दोन घटना तर मिनी ट्रेनचे डबे रुळावरून घसरल्याच्या होत्या. या घटनांमध्ये ट्रेनचे डबे दरीतच कोसळणार होते. त्यानंतर मध्य रेल्वेने प्रवासी सुरक्षेच्या कारणास्तव ट्रेन बंद करण्याचा निर्णय घेतला. या मार्गावर ट्रेन सुरू करायची झाल्यास अनेक आव्हाने आहेत, असे मध्य रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या रेल्वे मार्गावर असणारे रूळ खूपच जुने झाले आहेत. तसेच या रुळाखालील खडीही वाहून नामशेष झाली आहे. त्यामुळे रुळाखाली खडी टाकण्याचे आव्हान असल्याचे गोयल यांनी सांगितले. खडी टाकण्याचे कंत्राट आमच्याकडून देण्यात आले आहे. परंतु ही खडी रुळांपर्यंत कशी वाहून न्यायची हा मोठा प्रश्न आहे. तसेच प्रवाशांची सुरक्षाही महत्त्वाची आहे. दरीतून ही ट्रेन जात असल्याने आणि यापूर्वीच्या घडलेल्या घटना पाहता संरक्षक भिंत बांधणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. या कामासाठी बराच वेळ लागेल, अशी माहिती त्यांनी दिली. (प्रतिनिधी)