मुंबई : वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय हे मुंबईतील पर्यटकांच्या आकर्षणाचा मुख्य भाग असून, त्याचे आधुनिकीकरण लवकरात लवकर होणे अत्यंत गरजेचे आहे. ही बाब केंद्रस्थानी ठेवून आधुनिकीकरणाची कामे आणि प्रस्ताव यांचा जलदगतीने पाठपुरावा करण्याचे निर्देश देण्यात आल्याने आता राणीच्या बागेचे रूपडे पालटणार आहे.१८६२ मध्ये स्थापन झालेले वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय हे देशातील जुन्या प्राणिसंग्रहालयांपैकी एक असून, त्याचे क्षेत्रफळ सुमारे ५३ एकर आहे. हे उद्यान व प्राणिसंग्रहालय पुरातन वास्तू श्रेणी २(ब) म्हणून घोषित करण्यात आले असून, या प्राणिसंग्रहालयाचे वर्गीकरण मध्यम प्राणिसंग्रहालय असे करण्यात आले आहे. प्राणिसंग्रहालयाला दरवर्षी मोठ्या प्रमाणात नागरिक भेट देत असतात. २०१३-१४ मध्ये एकूण १२,२६,६७६ नागरिकांनी (१०,४१,९४७ प्रौढ व १,८४,७२९ लहान मुले) या उद्यान व प्राणिसंग्रहालयाला भेट दिली असून, त्यातून एकूण रुपये ६६,१४,०३२ इतका महसूल प्राप्त झाला आहे.३१ आॅक्टोबरअखेर या उद्यान-प्राणिसंग्रहालयात १६ जातींचे एकूण १४३ सस्तन प्राणी, ३० जातींचे २९६ पक्षी व ६ जातींचे ३२ सरपटणारे प्राणी व जलचर प्राणी असे एकूण ४७१ प्राणी/पक्षी अस्तित्वात आहेत. त्यामध्ये मुख्यत्वेकरून आशियाई हत्ती, हिमालयीन काळे अस्वल, पाणघोडे, तरस, नीलगाय, भेकर, चितळ, सांबर, चौशिंगा इ. सस्तन प्राणी, मिलीटरी मॅकॉव, भूतान पिकॉक फेझंट, आफ्रिकन करडे पोपट, रोझी पेलीकन, रेड क्राउंड के्रन, रंगीत करकोचे इत्यादी विविध जातींचे पक्षी तसेच मगर, सुसर इत्यादी सरपटणारे प्राणी यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)
भायखळ्यातील राणीच्या बागेचे रूपडे पालटणार!
By admin | Updated: December 2, 2014 00:52 IST