Join us

परदेशातून येणारे प्रवासी होणार क्वारंटाइन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:07 IST

मुंबई महापालिकेचा निर्णयलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : इंग्लंडमधील कोविडच्या नव्या प्रकारानंतर मुंबई महापालिकेने कडक पावले उचलली आहेत. त्यानुसार ...

मुंबई महापालिकेचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : इंग्लंडमधील कोविडच्या नव्या प्रकारानंतर मुंबई महापालिकेने कडक पावले उचलली आहेत. त्यानुसार सोमवारी मध्यरात्रीपासून परदेशातून विमानाने येणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाइन करण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेने शहरातील विविध हॉटेल्समध्ये दोन हजार खोल्या तयार ठेवल्या आहेत. ज्या प्रवाशांमध्ये लक्षणे आढळतील त्यांना थेट मरोळ येथील सेव्हन हिल्स रुग्णालयात पाठविण्यात येईल, अशी माहिती मुंबई पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सोमवारी दिली.

इंग्लंडमध्ये कोविड विषाणूचा नवीन प्रकार आढळल्यामुळे बुधवार मध्यरात्रीनंतर तेथून येणारी विमान सेवा बंद करण्यात आली आहे. त्यापूर्वी साेमवार मध्यरात्रीपासून तेथून पाच विमाने मुंबईत दाखल होणार आहेत.

क्वारंटाइन करण्यात येणाऱ्या प्रवाशांसाठी एक हजार खोल्या पंचतारांकित आणि फोर स्टार हाॅटेलमधील तर एक हजार खोल्या बजेट हाॅटेल्समधील असणार आहेत. या सर्व प्रवाशांना सात दिवस हॉटेलमध्ये क्वारंटाइन राहावे लागणार आहे. त्याचे शुल्क त्यांना भरावे लागणार आहे. तसेच बुधवारपासून युरोप खंडातील इतर देशांमधून तसेच मध्य पूर्व आशिया खंडातील देशांमधून येणाऱ्या प्रवाशांना महापालिकेच्या केंद्रांमध्ये सात दिवसांसाठी क्वारंटाइन करण्यात येईल, असे आयुक्तांनी सांगितले.

अमेरिकेसह, दक्षिण मध्य आशिया खंडातील देशांमधून येणाऱ्या प्रवाशांना होम क्वारंटाइन करण्यात येणार आहे. त्यांच्या हातावर तसे शिक्केही मारण्यात येतील. तसेच युरोप खंडातील इतर देशांमधून तसेच मध्य पूर्व आशिया खंडातील देशांमधून आलेल्या प्रवाशांमध्ये लक्षणे असल्यास त्यांना फोर्ट येथील जी.टी. रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे.