Join us
Daily Top 2Weekly Top 5

चाचणी अहवाल येईपर्यंत रुग्णाच्या संपर्कातील क्वारंटाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:08 IST

मुंबई - कोरोनाच्या बदलत्या रूपामुळे पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये ही लक्षणे दिसत नसल्याचे प्रमाण अधिक असल्याने प्रसार वाढण्याचा धोका आहे. बाधित ...

मुंबई - कोरोनाच्या बदलत्या रूपामुळे पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये ही लक्षणे दिसत नसल्याचे प्रमाण अधिक असल्याने प्रसार वाढण्याचा धोका आहे. बाधित रुग्णाच्या निकटच्या संपर्कातील व्यक्तीचा चाचणी अहवाल येईपर्यंत त्यांना क्वारंटाईन ठेवण्यात येणार आहे.

कोविडची तिसरी लाट येण्याची शक्यता आरोग्य तज्ज्ञांनी वर्तविली आहे. मात्र बदलत्या स्ट्रेनमुळे रुग्णांची संख्या आधीच्या दोन लाटांपेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने आरोग्य यंत्रणा सतर्क ठेवली असून, खाटांची संख्याही वाढविण्यात येत आहे. यामध्ये एक लाख खाटा तैनात ठेवणे, औषध आणि ऑक्सिजन साठा स्वच्छ ठेवणे, अशी कार्यवाही सुरू आहे.

कोविडचा प्रसार रोखण्यासाठी बाधित रुग्णाच्या जवळच्या संपर्कातील व्यक्तीचा शोध घेण्याची मोहीम तीव्र करण्यात आली आहे. त्यानुसार बाधित व्यक्तीच्या संपर्कातील किमान १५ ते २० व्यक्तीची चाचणी तात्काळ करण्यात येणार आहे. चाचणीचा अहवाल येईपर्यंत या व्यक्तींना क्वारंटाईन राहावे लागणार आहे. यासाठी आवश्यकतेनुसार विलगीकरण केंद्रही तयार ठेवण्यात येत आहे.

* विलगीकरण केंद्रात ३० हजार खाटा तयार ठेवण्यात येणार आहेत. येथे लक्षण असलेले संशयित तसेच बाधित रुग्णाच्या संपर्कातील व्यक्ती राहतील.

* तर लक्षण नसलेल्या बाधितांना ठेवण्यासाठी ४५ हजार खाटाही तयार ठेवण्यात येणार आहेत. सध्या जम्बो कोविड केंद्र आणि इतर ठिकाणी ३० हजार खाटा पालिकेकडे आहेत. यापैकी १० टक्के खाटा सध्या वापरात आहेत.