मुंबई : अतिरिक्त वीज उपलब्ध असतानाच्या कालावधीत मोठ्या शहरातील खंडित विजेचे प्रमाण शून्यावर आले पाहिजे. त्यादृष्टीने नियोजन करून प्राधान्यक्रम ठरवावेत. त्यानुसार काम करावे. मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता यांनी दौरे करून समस्या जाणून घ्याव्यात व सोडवाव्यात. ग्रामीण भागातही नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून विजेचे खांब उभारण्याची कामे करावीत, अशा सूचना ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या.महावितरणच्या राज्यभरातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी गुरुवारी मुंबई मुख्यालयातून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित बैठकीत बावनकुळे बोलत होते. ते म्हणाले, कोणत्याही कारणांनी वीजपुरवठा खंडित झाल्याने ग्राहकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन गेल्या तीन-चार वर्षांत वीज वितरण क्षेत्रात झालेल्या चांगल्या कामांच्या बळावर ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा देण्यासाठी काम करा. या कामी कुचराई करणाºया अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी दिला. दरम्यान, वीज ग्राहकांना विशेषत: ग्रामीण भागात वीजबिल भरणे अधिक सुलभ व्हावे, यासाठी महावितरणने स्वत:चे डिजिटलपेमेंट वॉलेट तयार केले आहे. या वॉलेटचेही बैठकीत लोकार्पण करण्यात आले. वॉलेटमुळे ग्राहकांना वीजबिल भरण्याच्या सोयीसोबतच देयकाच्या वसुलीतून मिळणाºया कमिशनच्या माध्यमातून अनेकांना उत्पन्नाचे नवीन साधन उपलब्ध होईल.
खंडित विजेचे प्रमाण शून्यावर आले पाहिजे- ऊर्जामंत्री बावनकुळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 02:10 IST