Join us

आधुनिक शेतीतून पिकवला दर्जेदार बासमती

By admin | Updated: October 8, 2014 22:54 IST

महागाईच्या खाईत लोटत चाललेल्या शेतीला ऊर्जितावस्था देण्याचा प्रयत्न कर्जतमध्ये एका शेतक-याने केलेला आहे.

विजय मांडे, कर्जतमहागाईच्या खाईत लोटत चाललेल्या शेतीला ऊर्जितावस्था देण्याचा प्रयत्न कर्जतमध्ये एका शेतकऱ्याने केलेला आहे. पारंपरिक शेतीला बाजूला ठेवून आधुनिक शेतीकडे त्यांनी आपली पावले वळवली आहेत. कर्जत - कल्याण रस्त्यावरील कोषाणे गावातील हरिश्चंद्र ठोंबरे या शेतकऱ्याने आधुनिक शेती करून नवीन पायंडा पाडला आहे. त्यांनी आपल्या एक एकर शेतीत पारंपरिक भात बियाण्याचा वापर न करता बासमती तांदळाचे पीक घेऊन शेतीत यशस्वी प्रयोग केला आहे.गेल्या तीस - पस्तीस वर्षांपासून दुग्ध व्यवसाय करून आपल्या कुटुंबाची गुजराण करणाऱ्या हरिचंद्र ठोंबरे यांच्या मालकीची पाच एकर शेतजमीन आहे. ते आधुनिक पध्दतीने शेती करून शेतामध्ये वेगवेगळे प्रयोग करत असतात. या वर्षी त्यांनी पाच एकर भात शेतीपैकी चार एकर शेतात एस.आर. टी च्या टोकण पध्दतीने चिंटू (सुपर सोना) हे भातपीक घेतले आहे, तर उरलेल्या एक एकरमध्ये त्यांनी बीएसएचचे बासमती बियाणे लावले होते. जून महिन्याच्या पहिल्या आठवडयात त्यांनी पेरणी केली. चार महिन्याच्या आत बासमतीचे भरघोस पीक आले आहे. हे पीक त्यांनी कापलेही आहे. त्यांच्या या शेती व दुग्ध व्यवसायात त्यांची पत्नी, मुले भरत व सोमनाथ मोलाची मदत करतात. जर मन लावून शेती केली आणि थोडी मेहनत घेतली तर कमी खर्चातही जास्त उत्पन्न मिळवून दाखवता येते, हे त्यांनी दाखवून दिले आहे. ठोंबरे हे उन्हाळ्यात आपल्या शेतात टोमॅटो, भेंडी, भोपळा, भूईमूग आणि भाजीपाला यांचेही पीक घेतात. त्यांनी दोन वर्षांपूर्वी कलिंगडाचे विक्र मी पीक घेऊन मुंबईतील मॉललाही फळे पुरविली होती, तर त्यांच्या शेतावर असलेल्या पेरूच्या झाडाला एक किलो वजनाचे पेरु लागलेले पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. आज शेती परवडत नाही, म्हणून अनेक शेतकरी शेती विकत आहेत, मात्र आधुनिक पध्दतीने शेती केल्यास आणि शेतीकडे लक्ष दिल्यास त्यातूनही कमी खर्चात जास्त नफा मिळू शकतो, हे ठोंबरे यांनी सांगितले.