Join us
Daily Top 2Weekly Top 5

पायधुनीमध्ये दिवसाढवळ्या वृद्धेला घरात घुसून लुटले

By admin | Updated: May 9, 2017 01:43 IST

पायधुनीमध्ये दिवसाढवळ्या घरात घुसून एका वृद्धेला लुटल्याची घटना रविवारी घडली. यामध्ये ६५ वर्षांच्या नजमा मोहम्मद

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पायधुनीमध्ये दिवसाढवळ्या घरात घुसून एका वृद्धेला लुटल्याची घटना रविवारी घडली. यामध्ये ६५ वर्षांच्या नजमा मोहम्मद पटेल जखमी झाल्या असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पायधुनी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध दुखापतीसह लुटीचा गुन्हा दाखल केला आहे.पायधुनी येथील झकेरिया स्ट्रीटवरील झुलेका मंजिल इमारतीच्या दुसऱ्या माळ्यावर पटेल या बहिणीसोबत राहतात. रविवारी दुपारी बहीण कामानिमित्त बाहेर गेली होती. त्या वेळेस पटेल एकट्याच घरात होत्या. दुपारी दोनच्या सुमारास त्या दरवाजा अर्धवट उघडा ठेवून झोपी गेल्या. हीच संधी साधत एका अनोळखी इसमाने त्यांच्या घरात प्रवेश केला. पटेल यांना जाग येताच त्याने पिशवी आणि ओढणीने त्यांचे तोंड दाबले आणि त्यांना मारहाण केली. त्यांच्या हातातील ६ सोन्याच्या बांगड्या घेऊन पळ काढला. तब्बल अर्धा तास त्यांच्यात आणि चोरात झटापट सुरू होती. घरी आलेल्या बहिणीला पटेल या बेशुद्धावस्थेत दिसल्या. त्या शुद्धीवर येताच त्यांनी झालेला घटनाक्रम सांगितला. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी पटेल यांच्याकडे धाव घेतली. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पटेल यांच्या तक्रारीवरून लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पायधुनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दीपक कुंडल यांनी दिली. या प्रकरणातील आरोपी ओळखीचाच असल्याचा संशय पोलिसांना आहे. तो आधीपासूनच घराबाहेर तळ ठोकून असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पटेल यांनी केलेल्या वर्णनावरून आरोपीचा शोध सुरू आहे. मात्र या घटनेमुळे पुन्हा एकदा वृद्धांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.