Join us
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांसाठीचे निर्णय जमिनीवर उतरवू

By admin | Updated: January 6, 2015 02:21 IST

पोलिसांसाठी सरकारने घेतलेले निर्णय जमिनीवर उतरविण्याची गरज आहे आणि ते नक्कीच उतरवू, असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त

ठाणे : पोलिसांसाठी सरकारने घेतलेले निर्णय जमिनीवर उतरविण्याची गरज आहे आणि ते नक्कीच उतरवू, असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त करून मुंबई-ठाणे आणि राज्यातील घरांविना असलेल्या दोन लाख पोलिसांच्या घरांबाबत सरकार आग्रही असल्याचे मतही त्यांनी ठाण्यात पोलिसांच्या एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले. तसेच राज्यात सुरू असलेल्या ‘रस्ता सुरक्षा सप्ताहा’दरम्यान येणाऱ्या सूचनेद्वारे त्यातून एक चांगली पॉलिसी राबवता येईल आणि ती राबवू, असे आश्वासनही त्यांनी दिले.ठाणे शहर पोलीस आयुक्तालयांच्या वतीने सोमवारी ‘रस्ता सुरक्षा-एक आव्हान’ या परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन ठाण्यात करण्यात आले होते. या वेळी रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने लहान मुलांकरिता तयार केलेल्या शॉर्ट फिल्मचे व महिला सुरक्षा सिस्टीम तसेच इन लाइन टू आॅन लाइन या सिस्टीमचे मुख्यमंत्री फ डणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या वेळी ठाण्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, पोलीस आयुक्त विजय कांबळे, सहपोलीस आयुक्त व्ही.व्ही. लक्ष्मीनारायण आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. रस्ता सुरक्षा विषयावर मार्गदर्शन करताना मुख्यमंत्र्यांनी ठाणे पोलिसांनी सुरू केलेल्या सिस्टीमचे कौतुक केले. मुलांसाठीच्या शॉर्ट फिल्मवर बोलताना, छोटा भीम, चुटकी आणि कालिया कार्टूनद्वारे मुलांना रस्ता सुरक्षेबाबत माहिती होणार आहे. ते पालकांना टोकतील आणि त्यामुळे ते नियम पाळतील, तसेच भविष्यात हीच पिढी मोठी होणार आहे. आपल्या मुलीमुळेच या कार्टूनची ओळख झाल्याचे मुख्यमंत्री सांगण्यास विसरले नाहीत. पोलीस माहिती यंत्रणेचा चांगला उपयोग करीत असल्याने लोकांमध्ये पोलिसांबद्दल चांगलीच भावना निर्माण होईल, असेही त्यांनी सांगितले.पोलिसांना फंड मिळत नसल्याने ते कारवाई करताना जो निधी शासकीय तिजोरीत जमा होतो, त्यातील ५० टक्के रक्कम पोलिसांच्या योजनांसाठी मिळावी तसेच शालेय पुस्तकात रोड सेफ्टीबाबत कार्यक्रम राबवावे, अशी मागणी या वेळी ठाणे शहर पोलीस आयुक्त विजय कांबळे यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडली. या कार्यक्रमास महापौर संजय मोरे, खासदार राजन विचारे, कपिल पाटील, आमदार गणपत गायकवाड, सुभाष भोईर, प्रताप सरनाईक, संजय केळकर आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)