कमलाकर कांबळे, नवी मुंबईशेतक-यांनी एकत्रित येवून हडपसर, पुणे येथे उभारलेल्या मगरपट्टा शहराची सिडकोलाही भुरळ पडली आहे. नवी मुंबई विमानतळबाधितांसाठी प्रस्तावित केलेल्या पुष्पकनगरची उभारणी मगरपट्टा सिटीच्या धर्तीवर करण्याची संकल्पना सिडकोने मांडली आहे. प्रकल्पग्रस्तांचे प्रबोधन करण्याचा निर्णय सिडकोने घेतला. विमानतळ प्रकल्पासाठी संपादित करावयाच्या जमिनीच्या मोबदल्यात प्रकल्पग्रस्तांना प्रस्तावित पुष्पकनगरमध्ये २२.५ टक्के विकसित भूखंड देण्यात येणार आहेत. डिसेंबर महिन्यात सोडत काढून भूखंड निश्चित करण्यात आले आहे. प्रस्तावित पुष्पकनगरला स्मार्ट सिटीचा दर्जा देण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. त्यानुसार येथे अत्याधुनिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करण्याचा सिडकोचा इरादा आहे. पुणे महापालिका हद्दीत हडपसर येथे मगरपट्टा हे अत्याधुनिक दर्जाचे शहर उभारले आहे. १२३ मगर कुटुंबीयांनी आपल्या मालकीची जमीन न विकता एकत्रित येवून हे जागतिक दर्जाचे शहर उभारले आहे. येथील अत्याधुनिक अशा शैक्षणिक, आरोग्य व व्यावसायिक सुविधांमुळे या शहराला जागतिक दर्जा प्राप्त झाला आहे. अगदी याच धर्तीवर प्रस्तावित पुष्पकनगरमधील भूखंडधारकांनी एकत्रित येवून आपल्या भूखंडांचा सामूहिक विकास करावा, अशी सिडकोची भूमिका आहे.पुष्पकनगरमधील भूखंडांना आतापासूनच सोन्याचे भाव आहेत. त्यामुळे बिल्डर्स, गुंतवणूकदार व दलाल मंडळींनी प्रकल्पग्रस्तांच्या भेटीगाठीवर भर दिला आहे. भूखंडांचा प्रत्यक्ष ताबा मिळण्यासाठी वर्ष उजाडणार आहे. मात्र त्याअगोदरच अनेकांनी भूखंड विक्रीचे व्यवहार सुरू केले आहेत. भविष्यात या भूखंडांच्या किमती कोटींच्या घरात जाणार आहेत. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी भूखंड विक्रीसाठी आताच घाई करू नये, असे सिडकोला वाटते आहे. प्रकल्पग्रस्तांचे संभाव्य आर्थिक नुकसान होवू नये, या भूखंडांचा लाभ त्यांना व त्यांच्या येवू घातलेल्या पिढीला व्हावा, या उद्देशाने पुष्पकनगरच्या उभारणीसाठी मगरपट्टा सिटीचा आदर्श घेण्याचा विचार सिडकोने चालविला आहे.
मगरपट्ट्याच्या धर्तीवर पुष्पकनगर!
By admin | Updated: February 22, 2015 22:29 IST