नवी मुंबई: विमानतळ प्रकल्पामुळे बाधित होणार्या प्रकल्पग्रस्तांसाठी दापोली गावाजवळ विकसित करण्यात येणारे पुष्पकनगर ही वर्ल्डक्लास सिटी असेल, असा विश्वास सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजय भाटीया यांनी व्यक्त केला आहे. विमानतळ प्रकल्पग्रस्तांना प्रस्तावित पुष्पकनगर येथे वाटप करण्यात येणार्या २२.५ टक्के भूखंडाच्या विकास कामांचा सिडकोचे अध्यक्ष प्रमोद हिंदूराव यांच्या हस्ते आज शुभारंभ करण्यात आला. त्याप्रसंगी भाटीया बोलत होते. विमानतळ उभारणीसाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. त्याची अंतिम मुदत ३0 जुलै आहे. त्यानंतर प्रक्रियेचा दुसरा टप्पा सुरू होईल. साधारण पुढील वर्षाच्या जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत विकासकांची नेमणूक करण्यात येईल, असे भाटीया यांनी यावेळी स्पष्ट केले. ही प्रक्रिया सुरू असतानाच समांतररित्या पुष्पकनगरच्या विकासाचे कामही सुरू असेल. विमानतळामुळे बाधित होणार्या दहा गावांच्या मोजमापाचे आणि वाटप पत्रांचे काम येत्या तीन महिन्यात पूर्ण करण्यात येईल. त्यानंतर पुढील वर्षाच्या सुरूवातीला प्रकल्पग्रस्तांना २२.५ टक्के भूखंडाचा ताबा देण्यात येईल, अशी माहिती भाटीया यांनी यावेळी दिली. याप्रसंगी सहव्यवस्थापकीय संचालिका व्ही.राधा, संचालक नामदेव भगत,माजी खासदार रामशेठ ठाकूर, उरणचे आमदार विवेक पाटील आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
पुष्पकनगर होणार वर्ल्ड क्लास सिटी
By admin | Updated: May 30, 2014 01:24 IST