Join us
Daily Top 2Weekly Top 5

शुद्धीकरण करणाऱ्यांनी आधी दलदलीतील स्मारकाची अवस्था बदलावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाच्या शुद्धीकरणावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शुक्रवारी शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाच्या शुद्धीकरणावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शुक्रवारी शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला. शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतीस्थळाची अवस्था आधी पाहा. तिथे सगळी दलदल आहे, पॅंट वर करून तिथे पोहोचावे लागते. बाळासाहेबांचा फोटोही नीट दिसत नाही. जागतिक कीर्तीचे स्मारक करण्याचा प्रयत्न करा. गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण करण्यापेक्षा आधी स्वतःची मनं शुद्ध करा व मग कारभार करा, अशा शब्दात राणे यांनी शिवसेनेला फटकारले.

जनआशीर्वाद यात्रेदरम्यान नारायण राणे यांनी गुरुवारी बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन केले. यानंतर सायंकाळी शिवसैनिकांनी स्मृतीस्थळाच्या शुद्धीकरणाचा घाट घातला. यावर शुक्रवारी राणे यांनी पत्रकार परिषदेत टीका केली. ज्यांना गोमूत्र शिंपडायचे त्यांना शिंपडू द्या. काय दूषित झाले होते हे त्यांनाच विचारा, असे म्हणतानाच कोणत्याही दैवताचे स्मारक असो, तिथे विरोधाची भाषा करू नये, भावनांचा विचार करावा. मांजरीसारखे आडवे येऊ नये. ज्यांना स्वातंत्र्याचा अमृत की हिरक महोत्सव माहीत नाही, त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार, अशी खोचक टीकाही राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

तुम्ही आमच्या खाली आहात

जनआशीर्वाद रॅलीतील अनेकांवर राज्य सरकार गुन्हे दाखल करत आहे. यासंदर्भात राणे म्हणाले की, सात नव्हे ७० हजार गुन्हे दाखल झाले तरी घाबरत नाही. ज्यांच्यावर गुन्हे झाले त्यांच्या पाठीशी उभा राहायला मी समर्थ आहे. मात्र, सरकारची ही वृत्ती चुकीची आहे. तुम्ही बैठका घेतल्या, सभा घेतल्या तेव्हा कोरोना नाही झाला का, असा प्रश्न करतानाच तुमच्या डोक्यावर कोणी तरी दिल्लीत बसले आहे, हे लक्षात ठेवा. आम्ही वर आहोत तुम्ही खाली आहात, असा इशाराही राणे यांनी दिला.