अनिरुध्द पाटील, बोर्डीपावसाअभावी रखडलेली शेतीची कामे पाऊस सुरू होताच आता नव्या उत्साहाने मार्गी लागत आहेत. मान्सून सक्रिय झाल्याने बळीराजाच्या आशा पल्लवित झाल्या असून शेतीसाठी खत खरेदीची लगबग सुरू झाली आहे. शेतीच्या बांधावरच खत ही योजना राबविली जात असली तरी काही ठिकाणी खताची टंचाई होत असल्याने शेतकरी अधिकच्या दराने का होईना खताची खरेदी करताना दिसून येत आहे. डहाणू तालुक्यात भात हे प्रमुख पीक आहे. १७,८४५.९० हेक्टर क्षेत्रात गरवी, निमगरवी, संकरित भाताची लागवड खरीप हंगामात केली जाते. शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीचा अवलंब केल्यानंतर जून ते आॅगस्ट या दोन महिन्यात युरिया व सुफला या रासायनिक खतांची मागणी अधिक प्रमाणात असते. मागणी-पुरवठ्यातील असंतुलनामुळे खतांचा तुटवडा, जादा दर, काळाबाजार, शेतकरी-विक्रेता संघर्षाच्या घटना नेहमीच घडतात. मान्सून लांबल्याने दुबार पेरणीच्या संकटाने शेतकरी हवालदिल बनला होता, मात्र पावसाने हजेरी लावल्यानंतर खताची दुकाने, कार्यकारी व सहकारी खत सोसायट्यांमध्ये शेतकरी खत खरेदी करताना दिसू लागला आहे. डहाणू तालुका कृषी विभागाने खरीप हंगामाकरिता शेतकऱ्यांच्या बांधावर खत योजना राबवली आहे. या योजनेतून डहाणू, कासा येथे सुफला खताचे वाटप शेतकऱ्यांना केले. कृषी सहाय्यकांनी कार्यक्षेत्रातील ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत (मे महिन्याच्या) व गृहभेटीद्वारे योजनेची माहिती दिली. प्रतिनग युरिया २८४, सुफला ८४१ रू. प्रमाणे शेतकऱ्यांची गावनिहाय रासायनिक खतांची यादी तयार करून डीडी प्राप्त केले. तालुका कृषी अधिकाऱ्यांनी यंत्रणानिहाय डीडी सुपूर्द केले. दरम्यान, कृषी सहाय्यकांनी लाभार्थी शेतकऱ्यांना घरपोच खत वाटप केले. खताचे दर बाजारभावाच्या मानाने कमी आहेत, असंघटित व स्पर्धात्मकतेअभावी अनेक शेतकरी शासकीय योजनांपासून वंचित रहात आहेत.
पावसाच्या आगमनाने बळीराजाला खत खरेदीचे वेध
By admin | Updated: July 5, 2014 03:46 IST