Join us

गृह खरेदीदारावरही दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:10 IST

देणी निर्धारित वेळेत न दिल्याचा ठपका : व्याजासह रक्कम अदा करण्याचे महारेराचे आदेशलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : निर्धारित ...

देणी निर्धारित वेळेत न दिल्याचा ठपका : व्याजासह रक्कम अदा करण्याचे महारेराचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : निर्धारित वेळेत प्रकल्पाचे काम करत नसल्याने विकासकावर विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे गृह खरेदीसाठी केलेल्या करारानुसार पैसे अदा करणार नाही, अशी गुंतवणूकदाराने घेतलेली भूमिका महारेराने फेटाळून लावली आहे. करारानुसार देय असलेली रक्कम पुढील ४५ दिवसांत व्याजासह अदा करा, अन्यथा करार रद्द करण्याचे अधिकार विकासकाला असतील, असे आदेश महारेराने दिले आहेत.

जयेश भिवटे यांनी दादर येथील रिचा हाउसिंग प्रोजेक्ट्स या कंपनीच्या पार्क मिस्ट या गृहप्रकल्पात २०१५ साली नोंदणी केली होती. ३ कोटी ८० लाख रुपये किंमत असलेल्या या घरासाठी नाममात्र रक्कम गुंतवून करार करण्यात आला होता. या इमारतीचे बांधकाम काही महिने रखडले होते. मात्र, ते सुरू झाल्यानंतर करारानुसार रक्कम अदा करण्यासाठी विकासकाकडून पत्रव्यवहार केला जात होता. २८ मजल्यांचे काम पूर्ण झाले असून ५० लाख रुपये भिवटे यांच्याकडून येणे अपेक्षित होते. परंतु, हे पैसे मिळत नसल्याने करार रद्द करावा, या मागणीसाठी विकासकाने महारेराकडे याचिका दाखल केली होती.

प्रकल्पाचे काम जर निर्धारित वेळेनुसार झाले असते तर आपण पैसे अदा केले असते. परंतु, आता विकासकावर विश्वास नसल्याने पैसे अदा करत नसल्याची भूमिका गुंतवणूकदाराने घेतली होती. तसेच, विकासक सातत्याने करारपत्रात बदल करत असल्याचा युक्तिवादही त्यांनी केला होता.

रेरा कायद्यानुसार करारानुसार पैसे अदा करणे ही गुंतवणूकदाराची जबाबदारी आहे. तसे होत नसेल तर तो कलम ११ (५)चा भंग आहे. या इमारतीचे बांधकाम जसे मार्गी लागत आहे त्यानुसार विकासकाला पैसे अदा करणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे पुढील ४५ दिवसांत ही रक्कम गुंतवणूदाराने अदा करावी. तसेच, थकलेल्या रकमेवर व्याज मागण्याचे अधिकार रेरा कायद्यान्वये विकासकाला आहेत. त्यामुळे करारपत्रानुसार त्या रकमेवर व्याजही विकासक घेऊ शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. ही रक्कम अदा न केल्यास विकासकाकडून गृह खरेदीचा करारही रद्द होऊ शकतो.