Join us

पम्पिंग स्टेशनची डेडलाइन हुकली, ठेकेदाराला दंड

By admin | Updated: June 20, 2017 05:50 IST

ब्रिमस्टोवड प्रकल्पांतर्गत पालिकेने मुंबईत आठ पम्पिंग स्टेशन बांधण्याचा निर्णय घेतला. मात्र दहा वर्षे उलटूनही हे काम धिम्या गतीने सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ब्रिमस्टोवड प्रकल्पांतर्गत पालिकेने मुंबईत आठ पम्पिंग स्टेशन बांधण्याचा निर्णय घेतला. मात्र दहा वर्षे उलटूनही हे काम धिम्या गतीने सुरू आहे. त्यामुळे पालिकेची डेडलाइन हुकली असून, प्रकल्पाचा खर्चही वाढला आहे. त्यामुळे वरळी येथील लव्हग्रोव्ह आणि क्लिव्हलॅन्ड पम्पिंग स्टेशनच्या बांधकामास विलंब केल्याबद्दल मुंबई महापालिकेने संबंधित ठेकेदाराला ९ कोटी ३४ लाख रुपये दंड ठोठावला आहे. हा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर मंजुरीसाठी आला आहे.मुंबईत पावसाळ्यात सखल भागात दरवर्षी पाणी तुंबते. या पाण्याचा त्वरित निचरा होण्यासाठी पालिका प्रशासनाने मुंबईत पम्पिंग स्टेशन उभारण्याचा निर्णय घेतला. त्यात हाजीअली, इर्ला, ब्रिटानिया, लव्हग्रोव्ह, क्लिव्हलँड, गझधरबंध, मोगरा, माहुल स्टेशनचा समावेश आहे. यापैकी गझरबंध पम्पिंग स्टेशनचे काम प्रगतिपथावर आहे. तर मोगरा व माहुल पम्पिंगचे काम प्रस्तावित आहेत. इतर पम्पिंग स्टेशन सुुरू आहेत.वरळी येथील लव्हग्रोव्ह आणि क्लिव्हलँड पम्पिंगचे काम युनिटी एम अ‍ॅण्ड पी-डब्ल्यू पीके कन्सोट्रीसम या ठेकेदाराला देण्यात आले होते. हे काम पावसाळा वगळून १५ महिने या कालावधीत पूर्ण करायचे होते. याबाबतचा प्रस्ताव २९ सप्टेंबर २०११च्या स्थायी समितीत मंजूर करण्यात आला होता. मात्र ठरलेल्या वेळेत काम पूर्ण न केल्याबद्दल ठेकेदाराला लव्हग्रोव्हसाठी ५ कोटी ४५ लाख ७९ हजार रुपये तर क्लिव्हलँड प्रकल्पासाठी ३ कोटी ८९ लाख ९ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.