Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रकाशकामुळे लेखकाची पात्रता ठरते

By admin | Updated: January 24, 2015 00:58 IST

लेखकाची ओळख केवळ त्याच्या लेखनामुळे होत नाही तर त्याचे लेखन लोकांपर्यंत पोचवणारे प्रकाशक त्याची खरी ओळख असतात.

मुंबई: लेखकाची ओळख केवळ त्याच्या लेखनामुळे होत नाही तर त्याचे लेखन लोकांपर्यंत पोचवणारे प्रकाशक त्याची खरी ओळख असतात. प्रकाशकाच्या दर्र्जावरून लेखकाची पात्रता ठरते, असे उद्गार ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी काढले. ज्येष्ठ प्रकाशक रामदास भटकळ यांच्या ८०व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. दादर पूर्व येथील बी.एन. वैद्य सभागृहात ‘मुक्त शब्द मासिक’तर्फे ‘महात्मा गांधी आणि वर्तमान’ या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले.यावेळी डॉ. अरुणा पेंडसे, डॉ. राजन गवस आणि आमदार कपिल पाटील परिसंवादात सहभागी झाले होते. राजकीय संस्कृतीला गांधीजींचे योगदान लाभले असल्याचे मत अरूणा पेंडसे यांनी व्यक्त केले. तसेच गांधीजी हे उत्तर आधुनिकवादी असल्याचे त्या म्हणाल्या. तर डॉ. राजन गवस यांनी गांधीजींच्या ‘खेड्याकडे चला’ या विचारांवर प्रकाश टाकला. गांधींच्या खेड्यांच्या विकासाची कल्पना आत्ताच्या काळात मागे पडली असल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. गांधीच्या विचारांना ‘ओ’ देणारी आणि ज्यांच्या हाकेला ‘ओ’ मिळत आहेत ते गांधींच्या विचारांची मंडळी आहेत का? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. तर गांधी नेहमीच वंचितांच्याच नव्हे तर शोषितांच्या मागे उभे राहिले, असे मत आमदार कपिल पाटील यांनी व्यक्त केले.या कार्यक्रमाच्या तिसऱ्या टप्प्यात डॉ. पुष्पा भावे यांनी प्रकाशक म्हणून ६३ वर्षे कार्यरत असलेल्या रामदास भटकळ यांची रंजक मुलाखत घेतली. भटकळ यांनीही प्रकाशकाच्या वाटचालीतील अनेक आठवणींना उजाळा दिला. या दरम्यान आलेले अनेक कडू-गोड अनुभव त्यांनी सांगितले. तसेच या क्षेत्रातील चढ-उताराबरोबरच घ्यावयाची खबरदारीही त्यांनी उपस्थितांना सांगितली. (प्रतिनिधी)