शुल्क नियामक प्राधिकरणाचे महाविद्यालयांना निर्देश
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : लॉकडाऊनच्या काळात आता महाविद्यालय प्रवेश प्रक्रिया पूर्ण होत आहेत. अशात अनेक व्यावसायिक शैक्षणिक संस्था व महाविद्यालयांकडून शुल्क नियमन प्राधिकरणाने ठरवून दिलेल्या शुल्कापेक्षा या ना त्या कारणाने अधिक शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या महाविद्यालये व शैक्षणिक संस्थांनी त्यांच्याकडे उपलब्ध अभ्यासक्रम व त्यासाठी दरवर्षीचे व संपूर्ण अभ्यासक्रमाचे शुल्क यांची माहिती ठळकपणे प्रसिद्ध करावी, अशा सूचना शुल्क नियामक प्राधिकरणाने (एफआरए) दिल्या आहेत. ज्या शैक्षणिक संस्था किंवा महाविद्यालये या निर्देशांचे पालन करणार नाहीत त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.
एफआरने जारी केलेल्या पत्रकांनुसार शैक्षणिक संस्था व महाविद्यालयांना त्यांच्याकडील अभ्यासक्रमांसाठी दरवर्षी आकारण्यात येणारे शुल्क, तसेच संपूर्ण अभ्यासक्रमासाठी लागू करण्यात येणारे शुल्क याची आपल्या संस्थेच्या दर्शनी भागात फलकावर लावावी लागेल, तसेच त्यांच्या माहितीपत्रकात आणि अधिकृत संकेतस्थळावर ही सर्व माहिती प्रसिद्ध करावी लागणार आहे. शैक्षणिक संस्थांनी माहिती देताना अभ्यासक्रमनिहाय मान्यताप्राप्त विद्यार्थी संख्या, नियामक मंडळ, आर्थिक स्थिती याची माहिती उपलब्ध करून द्यायची आहे, ज्याआधारे विद्यार्थ्यांना योग्य निर्णय घेण्यास मदत होईल, असेही प्राधिकरणाने म्हटले आहे. महाविद्यालये व शैक्षणिक संस्थांना ही माहिती मराठी व इंग्रजी तसेच संबंधित महाविद्यालय अल्पसंख्याक समाजासाठी असल्यास त्या समाजाच्या भाषेतही प्रसिद्ध करणे आवश्यक असल्याचे या आदेशात म्हटले आहे.
* कडक कारवाई करणार
विद्यार्थ्यांच्या फसवणुकीच्या अनेक तक्रारी आल्यामुळे याआधी विद्यापीठ अनुदान आयोगानेही (यूजीसी) हे निर्देश दिले आहेत. त्याच आधारावर आता एफआरएच्या अध्यक्षांनी संबंधित निर्देश महाविद्यलये व शैक्षणिक संस्थांना दिले आहेत. निर्देशानंतरही अनेक महाविद्यालयांनी ही माहिती न पुरविल्याने एफआरएने अनेक महाविद्यालयांना नोटीस बजावली आहे. मात्र, आता त्यांच्यावरील कडक कारवाईसाठी प्राधिकरणाकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे.
.................