Join us
Daily Top 2Weekly Top 5

शालेय शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते ‘वाट (एक नवी दिशा)’ पुस्तकाचे प्रकाशन संपन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:06 IST

मुंबई : रस्त्यावरील भरकटणाऱ्या व वंचित मुलांना शिक्षणाचा हक्क मिळण्यासंदर्भात सामाजिक विषयावरील ‘वाट (एक नवी दिशा)’ ...

मुंबई : रस्त्यावरील भरकटणाऱ्या व वंचित मुलांना शिक्षणाचा हक्क मिळण्यासंदर्भात सामाजिक विषयावरील ‘वाट (एक नवी दिशा)’ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते त्यांच्या बंगल्यावर संपन्न झाला. लेखिका ज्योती किरण किरतकुडवे यांनी लिहिले असून, हे त्यांचे चौथे पुस्तक आहे.

या पुस्तकातून लेखिकेने रस्त्यावर भरकटणाऱ्या व वंचित मुलांना शिक्षणाचा हक्क मिळण्यासंदर्भात जे लिखाण केले आहे ते अतिशय उल्लेखनीय आहे. ही एक काल्पनिक लघुकथा असून, त्यामध्ये दडलेले वास्तव सत्य आहे. या पुस्तकातून लेखिकेने मांडलेल्या प्रश्नावर विचार झाला तर आजही जी मुले शिक्षणापासून वंचित आहेत त्यांना शिक्षणाची ‘वाट’ म्हणजेच ‘एक नवी दिशा’ नक्कीच सापडेल.

सदर पुस्तक वंचित मुलांच्या शिक्षणाच्या हक्कासंदर्भात असल्याने माननीय शालेय शिक्षण मंत्र्यांनी लेखिका ज्योती किरण किरतकुडवे यांच्या लिखाणाचे कौतुक केले. आजही जी मुले शिक्षणापासून वंचित आहेत त्यांच्या उज्ज्वल भवितव्याचा आपण लवकरच विचार करू, असे आश्वासनही त्यांनी दिले. पुढे ही त्यांनी अशाच सामाजिक विषयावर लिखाणासाठी शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी डॉ. दौलतराव गांगुर्डे, श्याम कदम, किरण किरतकुडवे व कुमार आर्यन किरतकुडवे उपस्थित होते.

-------------------------------------------