नवी मुंबई : पनवेलमधील तालुका पोलीस ठाण्यासमोरील मुतारी रातोरात जमीनदोस्त करण्यात आली आहे. हे ठिकाण शहराच्या मध्यवर्ती भागात असल्याने नागरिकांची पुरती गैरसोय झाली आहे. मंगळवारी रात्री झालेल्या या घटनेसंदर्भात पनवेल नगरपरिषदेने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.नगरपरिषेदेने गर्दीच्या ठिकाणी सार्वजनिक मुताऱ्या बांधल्या होत्या. यामध्ये उरण नाका, आस्वाद हॉटेल, महाड बँक, पनवेल एसटी स्टँड आदी ठिकाणांचा समावेश आहे. त्यापैकी एसटी स्टँड, आस्वाद हाँटेलसमोरील मुताऱ्या नगरपरिषेदेने जमीनदोस्त केल्या व त्याठिकाणी नवीन मुताऱ्या उभारण्याची घोषणादेखील केली, मात्र ही घोषणा हवेतच विरलेली दिसत आहे. ज्याठिकाणी उर्वरित मुताऱ्या आहेत, त्याही जमिनदोस्त करण्याचे काम सध्या जोरात सुरू आहे. याबाबत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मंगेश चितळे यांना विचारले असता त्यांनी मुतारीची तोडफोड नगरपरिषदेने केलेली नाही. आम्ही या संदर्भात अनोळखी इसमाविरोधात तक्रार दाखल केली आहे, अशी माहिती दिली. पनवेल परिसरात अनधिकृत बांधकामांचे चांगलेच पेव फुटले आहे. त्या पार्श्वभूमीवर मुतारी जमीनदोस्त करण्यामागे काय हेतू आहे, याचा तपास करण्याची मागणी पनवेलवासीयांनी केली आहे. (प्रतिनिधी)
सार्वजनिक मुतारी गायब
By admin | Updated: December 5, 2014 00:29 IST