Join us  

वरळी-शिवडी उन्नत मार्गासाठी ७ जानेवारीला होणार जनसुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 1:59 AM

बीकेसीतील प्राधिकरणाच्या मुख्यालयात ७ जानेवारीला सकाळी ११ वाजता ही सुनावणी होणार

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (एमएमआरडीए) शिवडी-वरळी या उन्नत मार्गासाठी जनसुनावणी घेण्यात येणार आहे. बीकेसीतील प्राधिकरणाच्या मुख्यालयात ७ जानेवारीला सकाळी ११ वाजता ही सुनावणी होणार असून यात प्रकल्पाबाबत आक्षेप-हरकती आणि सूचनांवर चर्चा केली जाणार आहे. तसेच एमएमआरडीएच्या संकेतस्थळावरही या सूचना आणि हरकती ३१ डिसेंबरपूर्वी सादर करता येतील, असे स्पष्ट करण्यात आले.शिवडी ते न्हावाशेवा अशा मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पासाठी (एमटीएचएल) महत्त्वाचा असणारा शिवडी-वरळी उन्नत मार्गाचा अहवाल महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटीला (एमसीझेडएमए) एमएमआरडीएच्या वतीने सादर केला जाणार आहे. नोव्हेंबर महिन्यामध्ये एमएमआरडीएने एमसीझेडएमएकडे या प्रकल्पाची फाईल पाठविली होती. तेव्हा शिवडी-वरळी कनेक्टर मार्गासाठी एमएमआरडीएने जनसुनावणी घेतली नसल्याचे निरीक्षण एमसीझेडएमने नोंदवत ही फाईल पुन्हा पाठवली होती. त्यामुळे ही जनसुनावणी तातडीने घेण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. या उन्नत मार्गामुळे पर्यावरणाची हानी होऊ शकते, असे काही रहिवाशांचे म्हणणे आहे. त्यांचे याबाबतचे मतपरिवर्तन करण्यात येणार असून सद्य:स्थिती एमएमआरडीए नागरिकांना पटवून देणार आहे.तसेच एमएमआरडीए येथे होणारी वाहतूककोंडी आणि त्यामुळे होणाऱ्या प्रदूषणाची मात्रा तपासणार आहे. हा अहवालही यासोबत एमसीझेडएमएला सादर केला जाणार आहे. या प्रकल्पामुळे येथील वाहतूककोंडी फुटण्यासोबतच प्रदूषणही कमी होईल, असा दावा एमएमआरडीएने केला आहे. वांद्रेच्या दिशेला २०० मीटरचा रस्ता हा कोस्टल रेग्युलेशन झोन २ अंतर्गत येत आहे. हा मार्ग वांद्रे-वरळी सी-लिंक आणि भविष्यात तयार होत असलेल्या शिवडी-न्हावाशेवा या मार्गाला जोडणारा उन्नत मार्ग आहे. या मार्गामुळे पूर्व आणि पश्चिम प्रभाग जोडले जाणार असून, शिवडी-न्हावाशेवा मार्गाने थेट नवी मुंबईत जाणे शक्य होणार आहे.

टॅग्स :एमएमआरडीए