Join us

नवरात्रौत्सवात जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2016 04:06 IST

सप्टेंबर अखेरपर्यंत रजा घेणारा पाऊस यंदा आॅक्टोबर महिन्यातही मुंबईत मुक्कामाला आहे. पावसामुळे मंडपात पाणी साचून डासांची उत्पत्ती होण्याचा धोका लक्षात घेऊन महापालिकेच्या

मुंबई : सप्टेंबर अखेरपर्यंत रजा घेणारा पाऊस यंदा आॅक्टोबर महिन्यातही मुंबईत मुक्कामाला आहे. पावसामुळे मंडपात पाणी साचून डासांची उत्पत्ती होण्याचा धोका लक्षात घेऊन महापालिकेच्या कीटकनाशक विभागाने नवरात्रौत्सवात डेंग्यू-मलेरियाविषयी जनजागृती मोहीम हाती घेतली असून प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. उत्सवादरम्यान अनेक जण एकाच ठिकाणी एकत्र जमतात. पाऊस पडत असल्यामुळे मंडपाच्या आवारात कुठेही कोपऱ्यातही पाणी साचून राहिल्यास तेथे डासांची उत्पत्ती होण्याचा धोका संभवतो. संभाव्य धोका लक्षात घेऊन महापालिका क्षेत्रातील देवींच्या मंडपात धूरफवारणी आणि अन्य आवश्यक प्रतिबंधात्मक कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. त्याचबरोबरीने जनजागृती मोहीमदेखील हाती घेण्यात आली आहे. आतापर्यंत ५७० मंडपांत आणि आजूबाजूच्या परिसरात कार्यवाही करण्यात आली असल्याची माहिती कीटकनाशक विभागाचे अधिकारी राजन नारिंग्रेकर यांनी दिली आहे.डेंग्यू, मलेरियाचा प्रसार करणारे डास साचलेल्या किंवा साठविलेल्या स्वच्छ पाण्यातच प्रजोत्पादन करतात. ही बाब लक्षात घेऊन नवरात्रीनिमित्त उभारण्यात आलेले मंडप व मंडपांच्या आजूबाजूच्या परिसरात पाणी साचलेली ठिकाणे शोधण्यात येऊन ती नष्ट करण्याची अथवा तेथे औषध फवारण्याची कार्यवाही तत्काळ केली जात आहे. तसेच या ठिकाणी धूरफवारणीदेखील नियमितपणे करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)डेंग्यूच्या विषाणूंचा प्रसार करणारे एडिस इजिप्ती डास साचलेल्या किंवा साठविलेल्या स्वच्छ पाण्यातच प्रजोत्पादन करतात. हे डास चमचाभर पाण्यातसुद्धा प्रजोत्पादन करू शकतात. इडिस इजिप्ती डासांच्या पाण्यातील अवस्था या आठ दिवसांच्या असतात. त्यामुळे घरातील पिंप, ड्रम, बादल्या, पाणी साठविण्याची भांडी यातील पाणी आठवड्यातून किमान एक वेळा पूर्णपणे बदलावे. कोरडी केलेली भांडी स्वच्छ कापडाने दाब देऊन पुसून घ्यावीत. त्यामुळे भांड्यांच्या कडांना चिकटलेली डासांची अंडी नष्ट होतील. त्याचबरोबर आठवड्यातून किमान एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळणे आवश्यक आहे.