Join us  

स्वच्छतेबाबत जनजागृती करणार, टपाल खात्याचा प्रयोग

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2018 3:16 AM

घराघरात पत्रक पाठविण्याचा उपक्रम

मुंबई : स्वच्छतेबाबत नागरिकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी टपाल खात्याने घराघरात पत्रक पाठवून प्रयत्न करण्याचे पाऊल उचलले आहे. स्वच्छता ही सेवा या अंतर्गत विविध सरकारी कार्यालयांमध्ये स्वच्छतेचे महत्त्व समजावून सांगितले जात असताना, टपाल खात्याने नागरिकांना यामध्ये सहभागी करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे़

राज्याच्या कानाकोपऱ्यात टपाल खात्याची कार्यालये असल्याने त्याचा लाभ घेत, घराघरापर्यंत पोहोचण्यासाठी हा मार्ग निवडण्यात आला आहे. सर्व पोस्टमनच्या माध्यमातून ही पत्रके घरांमध्ये पाठविली जातील. इंग्रजी व हिंदी भाषेत ही पत्रके छापण्यात आली असून, शाळा-महाविद्यालये व घरांमध्ये ही पत्रके पाठवण्यात येत आहेत. स्वच्छता अभियानांतर्गत १५ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर दरम्यान ही मोहीम राबवली जात आहे. महाराष्ट्र व गोवा सर्कलमधील सर्व पोस्ट कार्यालये, टपाल खात्याची निवासी संकुले या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली आहे. सोशल मीडियामध्येदेखील ही पत्रके व्हायरल करण्यात येत आहेत. मुंबईत जीपीओमध्ये मुख्य पोस्टमास्टर जनरल हरीश अग्रवाल यांनी या मोहिमेत सहभाग घेऊन श्रमदान केले व स्वच्छतेचे महत्त्व कर्मचारी, अधिकाºयांना समजावून सांगितले. राज्यात विविध ठिकाणी टपाल खात्यातर्फे वृक्षारोपण करण्यात आले.

टॅग्स :मुंबई