Join us  

‘कोरोना’साठी दोन कोटींची तरतूद; कस्तुरबा रुग्णालयाला देणार बळकटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2020 2:50 AM

आजारांवरील नियंत्रणासाठी पालिका प्रशासनाची विशेष तरतूद

मुंबई : प्राथमिक आरोग्यसेवा पुरविणे हे मुंबई महानगरपालिकेचे प्राथमिक कर्तव्य आहे, असे म्हणत आजारांच्या नियंत्रणासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात आली आहे. चीनमधून पसरलेल्या कोरोना व्हायरसचा धोका मुंबईला होऊ शकतो, म्हणून महानगरपालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयाच्या बळकटीकरणासाठी दोन कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

कस्तुरबा रुग्णालयाच्या आवारामध्ये नवीन इमारत नियोजित असून, त्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात सात कोटी रुपयांची तरतूद प्रस्ताविली आहे. क्षय, एड्स, डेंग्यू आणि लेप्टोस्पायरोसिससारख्या संसर्गजन्य रोगांना प्रतिबंध व बालकांच्या १०० टक्के लसीकरणाची निश्चिती हे २०३० पर्यंतचे लक्ष्य आहे. २०१८च्या तुलनेत गेल्या वर्षी मलेरियामध्ये १३.४८ , डेंग्यूमध्ये ८.२७ टक्के तर एचआयव्हीमध्ये ३०.४६ टक्के घट झाल्याचे महापालिका प्रशासनाने नमूद केले आहे. पश्चिम - पूर्व उपनगरातील सहा रुग्णालयांमध्ये डी.एन.बी अभ्यासक्रम सुरू करण्यात येतील. या अभ्यासक्रमासाठी पूर्ण वेळ कंत्राटी तज्ज्ञ वैद्यकीय सल्लागारांच्या नेमणुका करण्यात येतील.

देवनार पशुवधगृहाचे पहिल्या टप्प्यातील आधुनिकीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. दुसऱ्या आधुनिकीकरणाच्या टप्प्याची निविदा प्रक्रिया लवकरच सुरू होईल. या अर्थसंकल्पात २० कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. देवनार व मालाड येथे जनावरांची शवदाहिनी उभारण्याकरिता काम सुरू करण्यात आले आहे. सर दोराबजी ट्रस्टच्या साहाय्याने महालक्ष्मी येथे प्राण्यांच्या शवदाहिनीसाठी उभारण्यात येणार असून, त्यासाठी ८.३१ कोटींची तरतूद आहे.

टॅग्स :कोरोनाकेईएम रुग्णालयमुंबईमुंबई महानगरपालिकामहाराष्ट्र