Join us  

स्मशानभूमीच्या पुनर्बांधणीसाठी तीन कोटी रुपयांची तरतूद

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2020 1:58 AM

महापालिकेचा निर्णय : आणखी दोन शवदाहिन्या वाढविण्याची मागणी

मुंबई : जोगेश्वरी पूर्वेकडील प्रतापनगर येथील महापालिकेच्या राजेश्वर वामन रागिनवार हिंदू स्मशानभूमीच्या पुनर्बांधणीचे काम मागील एक वर्षापासून सुरू आहे. स्मशानभूमीचे काम अगदी कूर्मगतीने सुरू असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच प्रतापनगर स्मशानभूमीची दुरवस्था झाल्यामुळे पुनर्बांधणीचा निर्णय पालिकेच्या आरोग्य विभागाने घेतला. परंतु स्मशानभूमीतील चार शवदाहिन्या बसविण्याचा प्रस्ताव असून आणखी दोन शवदाहिन्या वाढविण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.

हिंदू स्मशानभूमीच्या पुनर्बांधनीत दफनभूमी, शवदाहिनी, पर्जन्य वाहिन्या, मृत्यू नोंदणी कार्यालय, वखार, स्मशानाचे सौंदर्यीकरण इत्यादी नव्याने करण्यात येणार आहे. या पुनर्बांधणीच्या कामासाठी महापालिकेने ३ कोटी ५२ लाख रुपयांची तरतूद केली आहे. सध्या पुनर्बांधणीत स्मशानभूमीत चार शवदाहिन्या नव्याने बसविण्याचा प्रस्ताव आहे. परंतु स्मशानभूमीत आणखी दोन शवदाहिन्या वाढविण्याची मागणी स्थानिकांनी लेखी पत्राद्वारे पालिकेच्या आरोग्य विभागाला केली आहे. या स्मशानभूमीमध्ये पुरेशी जागा उपलब्ध असल्यामुळे अंत्यसंस्कारासाठी दोन शवदाहिन्या वाढविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

जोगेश्वरी, अंधेरी, सीप्झ, हिरानंदानी, पंप हाउस, आरे कॉलनी, गोरेगाव आणि गौतमनगर येथील नागरिकांना ही स्मशानभूमी सोईस्कर असल्यामुळे याचा वापर जास्त केला जातो. त्यामुळे अंत्यसंस्कारांसाठी येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. दर महिन्याला या स्मशानभूमीत १२० ते १३० मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जातात. स्मशानभूमीत दररोज पाच ते सहा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी येतात. मागील महिन्यात सकाळी तीन आणि दुपारच्या वेळी तीन मृतदेह आल्यानंतर पुन्हा दोन मृतदेह प्रतीक्षेत असल्याची बाब समोर आली होती. त्यादरम्यान एक मृतदेह अंत्यसंस्कारासाठी गोरेगाव येथील शिवधाम स्मशानभूमीत पाठविण्यात आल्याची माहिती कामगारांनी दिली.

मृतदेहावर अंत्यसंस्कार झाल्यावर तीन तास मृतदेहाच्या विघटन प्रक्रियेला लागतात. अंत्यसंस्कारासाठी आलेल्या लोकांना एक ते दोन तास ताटकळत राहावे लागते. या स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्यांची संख्या जास्त असल्यामुळे भविष्यात पुनर्बांधणीनंतर नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. स्मशानभूमीचे काम पूर्ण झाल्यावर अंत्यसंस्कारासाठी संख्या वाढणार असल्यामुळे चार शवदाहिन्यांऐवजी सहा शवदाहिन्या बसविण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.जोगेश्वरी, अंधेरी व इतर परिसरातून स्मशनभूमीत अंत्यसंस्कारासाठी येणाºया नागरिकांची संख्या मोठी आहे. स्मशानभूमीच्या पुनर्बांधणीत चार शवदाहिन्या पालिकेमार्फत प्रस्तावित असून त्या अपुºया आहेत. त्यामुळे आणखी दोन शवदाहिन्या वाढवून एकूण सहा शवदाहिन्या नागरिकांना उपलब्ध करून देण्यात याव्यात. - राजेंद्र कुडतरकर, स्थानिक रहिवासी.

टॅग्स :मुंबई महानगरपालिका