Join us  

कोरोनामुळे निर्माण परिस्थितीत अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वर्गास सुविधा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 11:12 PM

कठीण परिस्थितीमध्ये अतिउत्कृष्ट कामगिरी बजावणा-या कर्मचा-यांस योग्य बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनामुळे निर्माण परिस्थितीत अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वर्गास सुविधा द्या, असे निर्देश महापारेषणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे  यांनी दिले आहेत. या कठीण परिस्थितीमध्ये अतिउत्कृष्ट कामगिरी बजावणा-या कर्मचा-यांस योग्य बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे.

वीजपुरवठा ही अत्यावश्यक सेवा असल्याने ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा  देण्याच्यासाठी सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. यात सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांच्या मुख्यालयातच राहावे व  आवश्यकतेनुसार दूरध्वनीद्वारे संपर्कात राहून अत्यावश्यक सेवेकरिता  कर्मचा-यांशी समन्वय साधावा. ओळखपत्र सोबत बाळगावे व गणवेश परिधान करावा. अत्यावश्यक सेवेत असल्याबाबतचे पत्र व्यवस्था तत्काळ करण्यात यावी. जेणेकरून संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवेसाठी जाण्याकरिता अडथळा  निर्माण होणार नाही. सर्व तांत्रिक व अतांत्रिक कर्मचारी वर्गाने त्यांच्या कार्यक्षेत्रात राहणे अनिवार्य आहे. आवश्यकतेनुसार कामावर जाणे-येणे करण्यासाठी कंपनीचे वाहन उपलब्ध करून देण्याबाबत संबंधितांनी दक्षता घ्यावी. दुचाकी वाहनांवर अत्यावश्यक सेवा, महाराष्ट्र शासन उपक्रम, महापारेषण असे स्टीकर्स लावण्यात यावेत.  सर्व यंत्रचालकांनी उपकेंद्रातील त्यांच्या कामाच्या वेळा परस्पर समजूतीने ठरविण्यात याव्यात. सर्व लाईन स्टाफ यांनी त्यांना नेमून दिलेल्या वेळेनुसार कामकाज करावे. जे कर्मचारी बाहेर गावावरून कामाला येणे-जाणे करतात त्यांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था कंपनीच्या विश्रामगृहामध्ये किंवा कार्यालयामध्ये करण्याबाबत संबंधितांनी दक्षता घ्यावी.  मारहाण झाल्यास पोलीस अधिकारी यांचेशी संपर्क करावा. सर्व प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित करण्यात येत आहे. सर्व संबंधितानी इलेक्ट्रॉनिक (डिजिटल) प्रसारमाध्यमांचा उपयोग करावा,  जसे  व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, आॅडिओ कॉल्स, व्हॉट्स अँप, ट्विटर, फेसबुक, ई-मेल इत्यादींचा वापर दैनंदिन कामकाजात करावा. सुरक्षा रक्षक व सफाई कामगारांना देखील हॅन्ड सॅनिटायझर व मास्क उपलब्ध करून देण्यात यावेत; या सुचनांचा यात समावेश आहे.

टॅग्स :कोरोना सकारात्मक बातम्याकोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस